हातखंबा रिअलाइनमेंटजवळ एलपीजी गॅस टँकर अपघात; कोणतीही जीवितहानी नाही

मुंबई, दि. २९ : मुंबई-गोवा महामार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील रत्नागिरी जिल्ह्यात हातखंबा रिअलाइनमेंट भागात २८ जुलै रोजी रात्री सुमारे ११ वाजता एलपीजी गॅस टँकर ब्रेक फेल झाल्यामुळे उलटला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

अपघातानंतर घटनास्थळी तातडीने प्रशासन व आपत्कालीन यंत्रणा दाखल झाल्या. गॅस गळतीची शक्यता लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाहतूक तात्काळ पर्यायी मार्गावर वळविण्यात आली आहे.

सध्या उलटलेल्या टँकरमधील एलपीजी गॅस दुसऱ्या सुरक्षित टँकरमध्ये हलवण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर अपघातग्रस्त टँकरला क्रेनच्या साहाय्याने मार्गावरून हटवण्याचे काम देखील सुरु आहे.

प्रशासनाकडून स्थानिक नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. पुढील तपास आणि आवश्यक कार्यवाही संबंधित विभागांकडून करण्यात येत आहे, असेही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

किरण वाघ/विसंअ/