जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त ३० जुलै रोजी परिसंवाद

संवेदनशीलता ते संकल्प : शोषणाविरोधात लढा

मुंबई दि. २९ –  संयुक्त राष्ट्रसंघाने ३० जुलै हा जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन म्हणून घोषित केला आहे. या निमित्ताने मानवी तस्करी या समस्येबाबत चर्चा व्हावी, जनजागृती व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने “संवेदनशीलता ते संकल्प:  शोषणाविरोधात लढा” या राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन बुधवार दि. ३० जुलै २०२५ रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे केले आहे. आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या कार्यक्रमास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मार्गदर्शन करणार आहेत.

जगभरातील अनेक देश मानवी तस्करी या सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या गुन्हेगारी विरोधात लढा देत आहेत. भारतातही मानवी तस्करी हा चिंतेचा विषय आहे. मानवी तस्करीचे प्रकार, तस्करी ओळखणे, तस्करी रोखण्यासाठी संबंधित घटकांना प्रशिक्षण, यंत्रणांतील समन्वय, पीडितांना मदत, न्यायलयीन सहाय्य आणि त्यांचे पुनर्वसन तसेच जागरूकता मोहीम आदी विषयांवर देशभरातील तज्ञ व्यक्ती या परिसंवादात विचार मांडणार आहेत. राष्ट्रीय पातळीवरील परिसंवादात पोलिस, रेल्वे पोलिस दल, कायदेतज्ज्ञ, सरकारी वकील, महिला व बाल संरक्षण अधिकारी, परिवहन क्षेत्र, समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी, तांत्रिक तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.

००००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/