मुंबई, दि. २९ :- जपानचे भारतातील राजदूत ओनो केईची यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या भेटीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि श्री. केईची यांनी विविध क्षेत्रांतील सहकार्य, तसेच प्रकल्पांचे समन्वय आदी विषयांवर चर्चा केली. विशेषतः यात मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील विविध मेगा प्रोजेक्टस तसेच अन्य प्रकल्पांच्या समन्वयाबाबतही चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी प्रकल्पात जपानचे नेहमीच सहकार्य मिळत आले आहे. ते वृद्धिंगत करण्यावर आणि भारत-जपान उभय देशांचे संबंध आणखी दृढ करण्याबाबतही चर्चा झाली.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव डॉ. अश्विनी भिडे, जपानच्या वाणिज्य दूतावासाचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
0000