मुंबई, दि. 24 : महसूल विभागाचे काम गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख होण्यासाठी विभागातील अधिकाऱ्यांनी नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात. जनसंवाद, लोकशाही दिन आदी माध्यमातून त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
रायगड जिल्ह्यातील महसूल विभागाशी संबंधित कामांचा आढावा मंत्री श्री.बावनकुळे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी मंत्रालयातील अधिकाऱ्यांसह रायगड जिल्ह्यातील महसूल अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
मंत्री श्री.बावनकुळे म्हणाले, राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये रायगड जिल्हा प्रशासन मागे राहणार नाही याची दक्षता घ्यावी. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करुन लाभार्थ्यांना घरांसाठी पट्टे उपलब्ध करुन द्यावेत. नवीन वाळू धोरण आणि मार्गदर्शक सूचनांनुसार वाळू उपलब्ध करुन द्यावी. भूमि अभिलेख विभागाच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा नियोजनच्या निधीमधून खर्च करण्यात यावा. पाणंद रस्त्यांना क्रमांक देऊन दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात यावी. लोकअदालत सारख्या माध्यमांतून अर्धन्यायिक प्रकरणांच्या सुनावण्या येत्या तीन महिन्यात पूर्ण कराव्यात. याचबरोबर जिवंत सातबारा, तुकडेबंदी, शेतरस्ता, भोगवटादार 2 मधून 1 मध्ये करण्याची तसेच आकारी पड जमिनीची प्रकरणे, स्वामित्व योजनेचा लाभ देणे आदी कामे देखील कालमर्यादेत मार्गी लावावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
रायगड जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांनी यावेळी सुरू असलेल्या विविध कामांचा अहवाल सादर केला.
०००००
बी.सी.झंवर/विसंअ