‘सर्वांसाठी घरे’ संकल्पनेअंतर्गत मनमाडमधील जमिनींचे पट्टे तातडीने वाटप करा – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई दि. 24 : ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्व नागरिकांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे शासनाचे धोरण आहे. मनमाड शहरामधील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करुन सर्व लाभार्थ्यांना येत्या महिनाभरात जमिनींचे पट्टेवाटप करण्यात यावे, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बुधवारी यासंदर्भातील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला आमदार सुहास कांदे आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.बावनकुळे म्हणाले, मनमाड शहरात एकूण 1286 लाभार्थी आहेत. मनमाड शहरातील संभाजीनगर, बुधलवाडी, आंबडेकर चौक, बुरकुलवाडी, एकलव्य नगर या ठिकाणी अतिक्रमित जमिनी आहेत. या जमिनी नियमित करुन या जमिनींचा प्रश्न येत्या एका महिन्यात मार्गी लावण्यात यावा, असे निर्देशही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. म्हाडाच्या आणि नगरपालिकेच्या ताब्यातील जागा फ्री होल्ड करुन 563 रहिवाशांना या जागा देण्याबाबतची कार्यवाही देखील तातडीने करण्याची सूचना त्यांनी केली.

प्रशासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे श्री.कांदे यांनी सांगितले.

००००