सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : कै. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाचे उर्वरित काम पूर्ण करणे, स्मारकाचे नूतनीकरण व मजबुतीकरण यासाठी शासनास जवळपास 8 कोटी 28 लाख रूपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्या प्रस्तावास शासन स्तरावरून मंजुरी व आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.
पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मारकाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, जयश्री पाटील, समित कदम, वास्तुविषारद प्रमोद चौगुले यांच्यासह शासकीय अधिकारी आदि उपस्थित होते.
प्रारंभी पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांना अभिवादन करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्मारकाच्या कामाची पाहणी करून उर्वरित कामांचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी कै. पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मारकाकरिता प्राप्त अनुदान, शिल्लक अनुदान, बँक खात्यातील जमा व्याज, उर्वरित बांधकाम व नवीन बांधकामासाठी सुधारित अंदाजपत्रक, स्मारकाचे नूतनीकरण व मजबुतीकरणासाठी आवश्यक निधी आदि बाबींचा आढावा यावेळी घेतला.
०००००