मुंबई, दि. 17 : सक्षमता, ज्ञान आणि अनुभवाची जोड देऊन आपण सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात पूर्ण क्षमतेने योगदान देण्यास सक्षम आहोत. विकसित महाराष्ट्र २०४७ या राज्याच्या भविष्योन्मुख आराखड्यात सक्रीय सहभागी होणे हे आपले सामाजिक उत्तरदायित्व असल्याचे मत आयएसओवा (IASOWA) च्या नव-निर्वाचित अध्यक्ष अर्चना मीना यांनी व्यक्त केले.
भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आणि त्यांच्या सहचारिणींच्या संघटनेची (आयएसओवा) वार्षिक सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाली. या संघटनेतर्फे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि मनोरंजन क्षेत्रात विविध उपक्रम राबवले जातात. या सभेला माजी मुख्य सचिव तथा पूर्व अध्यक्षा सुजाता सौनिक, सचिव आर. विमला, खजिनदार झेबा नायक उपस्थित होते.
अध्यक्ष अर्चना मीना म्हणाल्या की, नंदघर योजनेअंतर्गत पाच अंगणवाड्या दत्तक घेता येतात. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांच्या सहाय्याने ग्रामीण आणि शहरी भागांना जोडण्यासाठी आयएसओवा च्या माध्यमातून कार्य केल्यास विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल. दूरदृष्टी आणि सकारात्मक विचारांनी ग्रामीण भाग शहराशी जोडण्याचे काम आपण करू शकतो. तसेच महिला बचत गटांना अधिक व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘आयएसओवा’ मार्फत प्रयत्न केले जातील.
माजी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सांगितले की, ‘आयएसओवा’ अंतर्गत पर्यावरण, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले जात आहे. सकारात्मक इच्छाशक्तीने आपण समाजात सक्रीय बदल घडवू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सचिव आर. विमला यांनी ‘आयएसओवा’च्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या बालकांना आरोग्य चिकित्सेसाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले असून, जे.जे. रुग्णालयात डोनोमीटर मशीन देण्यात आले आहे. शिक्षणासाठी टॅबचे वाटप करण्यात आले आहे. ‘आयएसओवा’च्या बालवाडीत लहान मुलांना मोफत उत्तम शैक्षणिक साहित्य आणि सुविधा पुरवल्या जातात. तसेच कर्णबधीर मुलांना आर्थिक सहाय्य दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी बालवाडी बद्दल रश्मी यादव यांनी माहिती दिली तर सुप्रिया चंदगल यांनी सूत्रसंचालन केले. IASOWA च्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000
श्रद्धा मेश्राम/विसंअ/