मुंबई, दि. १७ :- सीना-माढा उपसा सिंचन योजनेत बंद नलिका वितरण प्रणाली व ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यामुळे होणारी पाण्याची बचत आणि पावसाळ्यात धरण भरल्यामुळे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी बावी, तुळशी, परितेवाडी, पिंपळखुटे, अंजनगाव-खे, कुर्डु व अंबड या सात गावांना देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
विधानभवनात माढा तालुक्यातील सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी माढ्याचे आमदार अभिजित पाटील, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व इतर संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, या सात गावांना पाणी देण्याच्या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर या गावांतील शेतकऱ्यांना सिंचनाचा मोठा लाभ मिळणार आहे. सीना-माढा प्रकल्पाचा तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव महामंडळाने राज्य तांत्रिक सल्लागार समिती, पुणे यांना सादर केला असून, पुढील कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरु आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
0000
मोहिनी राणे/ससं/