पुनर्विकास योजनेतील खोल्या दहशतीने विक्री प्रकरणी ‘आयपीएस’ अधिकाऱ्यामार्फत चौकशी — मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. १७ : विलेपार्ले (पश्चिम) येथील प्रेमनगर गृहनिर्माण संस्था, झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत गरीब झोपडीधारकांच्या खोल्या धमकावून, दबाव टाकून परस्पर विक्री केल्याच्या प्रकरणाची भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी केली जाईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य श्रीमती मनीषा कायंदे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना सभागृहात उपस्थित केली होती.
मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, या योजनेचे विकासक यांनी सुरुवातीला केवळ दोन वर्षे भाडे दिल्यानंतर, पुढील सहा वर्षांत कोणतेही भाडे दिलेले नाही. अधिवेशनात नुकत्याच मंजूर करण्यात आलेल्या विधेयकातील तरतुदीनुसार, अशा विकासकांवर भाडे वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या योजनेला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत मंजुरी मिळाली असून, एकूण १४०७ झोपडीधारकांपैकी ७५३ झोपडीधारक पात्र ठरले आहेत. अधिक रहिवासी पात्र आहेत का याबाबत तपासणी केली जाईल, असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.
योजनेतील पुनर्वसन इमारतीचे तळमजला अधिक १२ मजले एवढ्या उंचीचे आराखडे मंजूर करण्यात आले असून, सद्यस्थितीत जोत्यापर्यंतचेच बांधकाम पूर्ण होऊन त्यानंतर काम बंद आहे. ही परिस्थिती गंभीर असून, शासनाने याची दखल घेतली आहे.
0000
किरण वाघ/विसंअ/
छत्रपती संभाजीनगरमधील मैदान परिसरातील अतिक्रमण रोखण्यासाठी कडक निर्देश – उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 17 : छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषद कार्यालयाच्या मालकीच्या सार्वजनिक वापरासाठी असलेल्या मैदान परिसरात अतिक्रमण व अवैध धंद्यांची वाढ होऊ नये यासाठी तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले, असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
विधान परिषदेतील सदस्य संजय केनेकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
छत्रपती संभाजीनगर शहरातील भूमापन क्रम. 4796/ ब व 4799 या ठिकाणी असलेल्या मैदान परिसरामध्ये अतिक्रमण थांबवण्यासाठी जिल्हा परिषदेस आवश्यक त्या कारवाईसाठी सूचना देण्यात आल्या असून, सुरक्षिततेसाठी दोन बाजूंनी गेट बसविण्यात आले आहेत. तसेच, जिल्हा परिषदेमार्फत या ठिकाणी सुरक्षा रक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मान्सूनपूर्व तयारी अंतर्गत झोननिहाय आणि प्रत्येक आरोग्य केंद्रानुसार प्रतिसाद पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
0000
मालेगाव शहरातील सायझिंग उद्योगांची कार्यप्रणाली नियमबद्ध; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
मुंबई, दि. 17 : मालेगाव शहरामध्ये कापडावर प्रक्रिया करणारे एकूण १५९ सायझिंग उद्योग सध्या कार्यरत असून, शहरातील वातावरण हवा गुणवत्ता ही सर्वसाधारणपणे ‘मध्यम’ स्तरावर आहे. पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि परवानगीविना चालणाऱ्या सायझिंग उद्योगांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
विधान परिषदेत सदस्य डॉ. परिणय फुके यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी प्रवीण दरेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.
या सायझिंग उद्योगांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आवश्यक संमती प्रदान करण्यात आली असून, मालेगाव महानगरपालिकेचा ना-हरकत दाखला प्राप्त झाल्यानंतरच संमतीपत्र देण्यात आली आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्योगांमध्ये औद्योगिक कारणासाठी अल्प प्रमाणात पाण्याचा वापर केला जात असून, प्रक्रियेमध्ये निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. बॉयलरसाठी प्रामुख्याने लाकडाचा वापर केला जात असून, धुलीकण नियंत्रणासाठी डस्ट कलेक्टर व धुरांडे (चिमणी) बसविण्यात आल्या आहेत.
वातावरणीय हवा गुणवत्ता मापन केंद्र मालेगावमध्ये कार्यरत असून, प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत सातत्याने तपासण्या केल्या जातात. यावेळी आढळलेल्या त्रुटींच्या अनुषंगाने, अवैधरित्या इंधन म्हणून प्लास्टिक स्क्रॅपचा वापर, तसेच सांडपाणी प्रक्रिया संयंत्रातील दोष यामुळे पुर्वी चार सायझिंग उद्योगांवर बंदी आदेश जारी करण्यात आले होते, अशी माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
0000
किरण वाघ/विसंअ/