मुंबई, दि. 7 : मिरा-भाईंदर शहरातील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, तसेच तांत्रिकदृष्ट्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
आढावा बैठकीस आमदार नरेंद्र मेहता, आमदार निरंजन डावखरे, मिरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, वैद्यकीय अधीक्षक जाफर तडवी, आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. विजय कंदेवाड, डॉ. स्वप्नील लाळे, ठाण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी मिरा-भाईंदर शहरातील ‘पंडित भीमसेन जोशी’ येथील शासकीय रुग्णालयाच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक विविध उपाययोजना करण्याचे सूचना निर्देश दिले. नेत्र चिकित्सा अधिकारी, आयुष अंतर्गत आणि अन्य आवश्यक वैद्यकीय पदांसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी. पंडित भीमसेन जोशी रूग्णालयांतर्गत नर्सिंग कॉलेजची स्थापना करण्यासाठी प्रस्ताव विभागाकडे सादर करण्यात आला असून या प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तो तातडीने सादर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
या रुग्णालयासाठी स्वतंत्र रक्तपेढी मंजूर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करणे, ETP-STP उभारणीसाठी आवश्यक प्रस्ताव तयार करणे, रुग्णालयातील रॅम्प बनवण्याचे काम मार्गी लावणे, एनसीडी विभाग चालू करणे, रुग्णालयाचे थकीत वीज बिल आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीत मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या कामकाजाचा देखील आढावा घेण्यात आला.
ठाणे येथील विठ्ठल सायन्ना जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय, परिचारिका प्रशिक्षण केंद्र व वसतीगृहाचे बांधकाम व कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी सामाजिक गरज म्हणून राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वार्ड करण्यात यावेत अशी मागणी केली. याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील विठ्ठल सायन्ना सामान्य जिल्हा रूग्णालय इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी यावेळी दिले.
०००
जयश्री कोल्हे/ससं/