विधानपरिषद प्रश्नोत्तरे

नर्मदा नदीचे ११ टीएमसी पाणी वापरासाठीची प्रक्रिया एक वर्षात पूर्ण करणार – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. ७ – नर्मदा पाणी वाटप निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला १०.८९ टीएमसी पाणी येते. हे पाणी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी भागाला देण्यासाठीची प्रक्रिया येत्या एक वर्षात पूर्ण केली जाईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी सदस्य चंद्रकांत रघुवंशी, शशिकांत शिंदे, सतेज पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा हे भाग डोंगराळ असल्याने पाणी अडवण्यात अडचणी असल्याचे सांगून जलसंपदा मंत्री श्री. महाजन म्हणाले की, भौगोलिक परिस्थितीमुळे नर्मदा नदीतून ५ टीएमसी आणि तापी नदीतून ५.५९ टीएमसी पाणी घेण्याचा करार गुजरात राज्याशी २०१५ मध्ये करण्यात आला आहे. या भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी ५ हजार ५१७ कोटींचा एक आणि ९५७ कोटींचा एक असे दोन प्रकल्प राबवण्यात येत आहेत. त्याचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे. याच्या सर्व मंजुऱ्या आठ ते दहा महिन्यात देण्यात येतील आणि येत्या एक वर्षात हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे श्री. महाजन यांनी सांगितले.

०००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांमध्ये अनियमितता प्रकरणी चौकशीनंतर योग्य ती कारवाई – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

मुंबई, दि. ७ : जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा आणि बोदवड तालुक्यातील घाणखेड येथे १५ वा वित्त आयोग व दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत विकास कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल सादर केला असून विभागीय चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या अहवालानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य एकनाथ खडसे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.

या प्रश्नाच्या उत्तरात मंत्री श्री. गोरे म्हणाले, मौजे वढोदा येथील ग्रामसेवक यांची बदली झाली असून त्यांची विभागीय चौकशी सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे सरपंचांवर नियम ३९/१ अन्वये कारवाई केली जाईल. तर, मौजे घाणखेड येथील ग्रामसेवक यांचे निलंबन करण्यात आले असून सात महिन्यांनंतर पुनर्स्थापित करण्यात आले आहे. त्यांची सुद्धा विभागीय चौकशी सुरू असून दोन्ही प्रकरणी विभागीय चौकशीचा जो अहवाल येईल, त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

 

अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील –   सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि.7 :- अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी अपेक्षित निधी मिळावा यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. यासाठी निधीची मागणी पुरवणी मागणीतून पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य संजय खोडके यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.

सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी स्पष्ट केले की, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे आरोग्य विभागाचे एक महत्त्वाचे केंद्र असून, कॅथलॅबचे काम पुढील 15 दिवसांत पूर्ण करण्यात येईल. हॉस्पिटलमधील ऑपरेटिव्ह डॉक्टर्सच्या मानधनवाढीबाबत सदस्य विक्रम काळे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, त्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला असून, विभागाच्या नियमांनुसार त्याला मान्यता देण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील निधीच्या वितरणात अन्याय होत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना मंत्री श्री.आबिटकर म्हणाले की, या योजनेमधून शासकीय रुग्णालयांना सध्या फक्त 12 टक्के निधी मिळतो. त्यामध्ये वाढ होऊन 50 टक्के पेक्षा जास्त निधी मिळावा, यासाठी नव्या धोरणावर काम सुरू असून, ते लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केले जाईल.

सदस्य चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आबिटकर म्हणाले की, महात्मा फुले जन आरोग्य योजनेत रुग्णांकडून पैसे घेणे हा गंभीर प्रकार असून यावर तत्काळ चौकशी सुरू करण्यात येईल.

000

संजय ओरके/विसंअ

 

जल जीवन मिशन अंतर्गत योजनेतील प्रगतीपथावरील कामे लवकरात लवकर पूर्ण करणार – पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. ७ : राज्यात जल जीवन मिशन अंतर्गत एकूण ५१,५५८ योजना मंजूर असून २५ हजार ५४९ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित प्रगतीपथावर असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य डॉ. प्रज्ञा सातव यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यानुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, राज्यात जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर योजनेद्वारे ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी सुमारे ६१ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. जल जीवन मिशन अंतर्गत योजनांच्या कामांवर विपरित परिणाम होऊ नये म्हणून राज्य शासनातर्फे विशेष बाब म्हणून २४८३.५८ कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे.  या योजनांचे थर्ड पार्टी ऑडिट झाल्याशिवाय देयके अदा करण्यात येत नाहीत.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

 

बांधकामापूर्वी रक्कम अदा केल्याप्रकरणी शाखा अभियंता आणि  कार्यकारी अभियंत्याचे निलंबन – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

मुंबई, दि. ७ : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे लासूर येथील शाळा बांधकाम आणि मौजे गुरुधानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामाच्या पूर्वीच १४७ लाख रुपये ठेकेदाराला अदा करण्यात आले. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीअंती संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभागातील शाखा अभियंता तसेच कार्यकारी अभियंता यांचे निलंबन करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी पुढील दोन महिन्यात करण्यात येणार असून यात जे तथ्य आढळेल त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

विधानपरिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. यात विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सदस्य ॲड.अनिल परब, भाई जगताप यांनीही उपप्रश्न विचारला.

मंत्री गोरे म्हणाले की, या बांधकामांदर्भात चौकशी करण्यात आली असून प्रत्यक्षात झालेल्या कामापेक्षा अधिकचे मूल्यांकन मोजमाप पुस्तिकेत नोंदविण्यात आले आहे. कामाचे फोटो, टेस्ट रिपोर्ट नसतानाही देयके मंजूर करण्यात आली आहे. यासंदर्भात आदर्श कार्यपद्धती असूनही त्यानुसार ही देयके अदा केली असल्याचे त्यांनी आपल्या उत्तरात सांगितले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ