चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय सुधारणा मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचासुध्दा सन्मान केला.
नियोजन भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त विपीन पालिवाल, अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे, उपसंचालक आनंद रेड्डी, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, श्री. लाटकर आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री डॉ. श्री. उईके म्हणाले, आदिम जमातीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी.एम. जनमन आणि धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत विविध शासकीय विभागामार्फत आदिवासींना एकत्रितपणे योजनांचा लाभ देण्यात येत आहे. यात घरकुल, वनपट्टे, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, आयुष्मान कार्ड, रेशन कार्ड, विद्युत जोडणी, जात प्रमाणपत्र, जॉब कार्ड, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, सातबारा, पीएम किसान, उत्पन्न दाखला, जनधन खाते आदींचा समावेश आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात 18 टक्के लोकसंख्या आदिवासींची असून दोन प्रकल्प कार्यालय आहेत. जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूरची टीम मन लावून काम करीत आहे. धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाच्या माध्यमातून 17 विभागाच्या 25 सेवा देण्यात येत आहे. धरती आबा अभियान प्रत्येक घरापर्यंत पोहचले पाहिजे. यापुढेही आदिवासी समाजाला काय अपेक्षित आहे, त्यानुसारच योजना राबविली जाईल. आदिवासींना लाभ खरच मिळाला की नाही, याची प्रकल्प अधिका-यांनी शहानिशा करावी. योजनेमध्ये गैरप्रकार होऊ देऊ नका, गरजवंतांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुक्ष्म नियेाजन करावे.
प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत 12360 लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात आला आहे. या अभियानात जिल्ह्यातील 167 गावांचा समावेश असून चंद्रपूर प्रकल्प कार्यालय अंतर्गत 115 गावे तर चिमूर प्रकल्प कार्यालयअंतर्गत 52 गावांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 87 गावांमध्ये धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाचे शिबीर घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
उत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिका-यांचा सन्मान
राज्य शासनाच्या 100 दिवस प्रशासकीय सुधारणा मोहिमेत उत्कृष्ट कार्य करून राज्यात अव्वल स्थान प्राप्त करणारे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचा पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबतच नागपूर विभागात जिल्ह्यातील 19 शासकीय कार्यालयांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संबंधित अधिका-यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यात प्रथम क्रमांक प्राप्त करणारे जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नाकर नलावडे, सा.बां. उपअभियंता (मूल) राजेश चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी (नागभीड) प्रफुल गव्हारे, तहसीलदार (नागभीड) प्रताप वाघमारे, तालुका वैद्यकीय अधिकारी (नागभीड) डॉ. विनोद मडावी, पशुधन विकास अधिकारी (वरोरा) डॉ. सतिश अघडते.
द्वितीय क्रमांक प्राप्त करणारे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक आशा कवाडे, जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख भुषण मोहिते, उपविभागीय अधिकारी (ब्रम्हपूरी) पर्वणी पाटील, महावितरण उपअभियंता (मुल) चंदन चौरसिया, उपजिल्हा रुग्णालय (ब्रम्हपूरी) डॉ. प्रितम खंडाळे, तालुका कृषी अधिकारी (कोरपना) गोविंद ठाकूर, बालसंरक्षण अधिकारी (मूल) आर्यन लोणारे, नगर परिषद मुख्याधिकारी (नागभीड) राहुल कंकाळ यांचा समावेश होता.
०००