बॉम्बे बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार

मुंबई उच्च न्यायालय, बॉम्बे बार असोसिएशनने मला घडवलं - सरन्यायाधीश भूषण गवई

मुंबई, दि. ४ : मुंबई उच्च न्यायालयाची ही इमारत, बॉम्बे बार असोसिएशन आणि इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी मला घडवलं. आज जे काही आहे ते या संस्थांमुळेच. बॉम्बे बार असोसिएशन ही संस्था माझी कुटुंबासारखी आहे. या संस्थेच्या पाठिंब्याशिवाय मी आज या पदावर असू शकलो नसतो. ही वकिल संघटना म्हणजे न्यायव्यवस्थेला विचारवंत देणारी मातृसंस्था आहे, अशा शब्दांत भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी भावना व्यक्त केल्या.

न्यायमूर्ती श्री. भूषण गवई यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल बॉम्बे बार असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्री. गवई बोलत होते.  यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे, श्री. गवई यांच्या सुविद्य पत्नी डॉ. तेजस्विनी गवई, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग, महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल देशमुख, राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, ॲडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रशांत रेळेकर, बॉम्बे बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठक्कर, उपाध्यक्ष व्ही आर धोंड, सचिव फरहान दुभाष आदी उपस्थित होते.

आज सत्कार होत असलेल्या कोर्टरुमध्येच लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केलेली “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,” ही गर्जना आजही आपल्याला प्रेरणा देते, असे सांगून न्यायमूर्ती श्री. गवई यांनी आजपर्यंतचा प्रवास उलगडला. न्यायमूर्ती गवई यांनी आपल्या कारकिर्दीत मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजी नगर व गोवा खंडपीठांवर काम करतानाचे अनुभव सांगितले आणि हे सर्व अनुभव त्यांच्या न्यायिक दृष्टिकोनाच्या जडणघडणीत कसे उपयुक्त ठरले, हेही स्पष्ट केले.

सरन्यायाधीश श्री. गवई म्हणाले की, “संविधान हेच आमचे अंतिम मार्गदर्शक तत्त्व आहे आणि न्यायाधीश म्हणून आमची जबाबदारी केवळ अधिकार वापरण्याची नाही, तर कर्तव्य बजावण्याचीही आहे. रिक्त न्यायाधीश पदं भरली गेली तर प्रलंबित खटल्यांवर नियंत्रण येईल. आम्ही नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आणत आहोत. गेल्या काही दिवसांत अनेक नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

त्यांनी बार असोसिएशनने सुरू केलेल्या ‘पॉडकास्ट सिरीज’, व ‘बीबीए अ‍ॅप’चे कौतुक केले.

कार्यक्रमात न्यायमूर्ती दीपांकर दत्ता न्यायमूर्ती गवई यांचे विशेष कौतुक करताना म्हणाले की, न्यायमूर्ती श्री. गवई यांची विधी आणि संविधानातील जाण, विनम्रता आणि कायद्याचा अभ्यास यांचे उदाहरण देशभरातील न्यायाधीशांसाठी आदर्श आहे. नागपूरमधील न्यायालयातून सुरू झालेली न्यायमूर्ती गवई यांची कारकीर्द ही मेहनत, प्रामाणिकपणा आणि मूल्यनिष्ठा यांचे प्रतिक आहे. न्यायमूर्ती श्री. गवई यांचा मुंबई उच्च न्यायालयातील काळ केवळ त्यांच्या ऐतिहासिक निर्णयांसाठीच नव्हे, तर त्यांच्या शांत संयमी, प्रखर कायदेशीर बुध्दिमत्ता आणि सौम्य विनोदबुद्धीसाठीही लक्षात राहतो. त्यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून निवड हा फक्त मुंबई बारच नव्हे, तर संपूर्ण मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठीही गौरवाचा क्षण आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. आराधे यांनी मनोगतात श्री. गवई यांच्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले की, लोकसेवा व न्यायव्यवस्था हीच खरी सेवा हे श्री. गवई यांचे तत्वज्ञान आहे. त्यांनी आतापर्यंत दिलेले निर्णय न्यायव्यवस्थेतील संवेदनशीलता आणि संविधान निष्ठा दर्शवतात. ते दूरदर्शी आहेत. त्यांच्या निर्णयांमुळे जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला.

यावेळी महाधिवक्ता श्री. सराफ, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल श्री. सिंह यांनीही मनोगत व्यक्त केले. बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. नितीन ठक्कर यांनी प्रास्ताविक केले. सचिव फरहान दुभाष यांनी सूत्रसंचालन केले.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/