प्रामाणिक मेहनत आणि जिंकण्याच्या इच्छाशक्तीतून ध्येयप्राप्ती शक्य – सरन्यायाधीश भूषण गवई

मुंबई, दि. 4 : व्यक्तीच्या जडणघडणीत चांगले संस्कार आणि सकस मुल्यांची जोपसना या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात, कोणत्याही यशाचा मार्ग हा खडतर असतो. मात्र प्रामाणिक मेहनत आणि जिंकण्याच्या इच्छाशक्तीतून ध्येयप्राप्ती शक्य असते, असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.

कुलाबा येथील होली नेम हायस्कूलमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना सरन्यायाधीश भूषण गवई बोलत होते. यावेळी आर्च बिशप जॉन रॉडरिक्स, बिशप डॉमनिक्स फर्नांडिस, व्यवस्थापक फादर कॉनस्टॉन्सीयो नोरोना, प्रिन्सिपॉल सिस्टर लॉरेन्सीया  परेरा यांच्यासह संबंधित मान्यवर उपस्थित होते.

सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, प्रत्येकाच्या वाटचालीत शालेय जीवनाचा काळ हा सर्वात महत्वाचा असतो. शालेय जीवनातील अनेक आठवणी होली नेम हायस्कुलमधील आहेत, त्याच  शाळेत आज विशेष सत्कार होत असल्याचा क्षण निश्चितच खूप आनंदाचा आणि अभिमानाचाही आहे. आईवडिलांसोबतच या शाळेने आपल्यावर धर्मनिरपेक्षता, एकात्मता, बंधुभावाचे संस्कार केले. या  शाळेत वेगवेगळ्या समुहाच्या मित्र-परिवारासोबत एका उत्तम वातावरणात शालेय जीवन जगता आले. भारतीय संविधानाचे समतेचे तत्वही शालेय जीवनात या ठिकाणी शिकायला आणि अनुभवायला मिळाले. आपल्या आजपर्यंतच्या वाटचालीत होली नेम शाळेच्या शिकवणुकीचे, येथील शिस्त, संस्काराचे मोठे योगदान असल्याचे सांगून श्री.गवई म्हणाले की, यशाचा मार्ग हा खडतर असला तरी कोणत्याही क्षेत्रात करियर करण्याचे ठरवत असताना विद्यार्थ्यांनी त्यासाठी कष्ट घेण्याची, प्रामाणिक मेहनत करण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे. जिंकण्याच्या इच्छाशक्तीमुळेच ध्येय प्राप्त करणे शक्य होत असते. आपल्या वडिलांच्या इच्छेमुळे आपण वकिली क्षेत्रात करियर करण्याचे ठरवले असेही श्री.गवई यांनी यावेळी सांगितले.

आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पद असलेल्या सरन्यायाधीश पदी विराजमान होत असल्याचा सार्थ अभिमान आणि  आनंद शाळा व्यवस्थापनाला असून प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपण एक प्रेरणा असल्याच्या भावना  आर्च बिशप जॉन रॉडरिक्स यांनी यावेळी व्यक्त केल्या.

००००

वंदना थोरात/विसंअ