नागपूर, दि. 5 – आपणास देण्यात आलेले कोणतेही काम श्रेष्ठपणे करण्याची गरज आहे. कोणतेही काम छोटे अथवा मोठे असत नाही. प्रत्येक कामाला, कष्टाला सारखेच मूल्य असते. गीतेमध्ये हेच तत्वज्ञान सांगितले आहे. त्यामुळे आपले काम सर्वोत्तम पद्धतीने करीत यशाची शिखरे पादाक्रांत करण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.
विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा रोजगार व प्रशिक्षण विभाग, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराज बाग चौक स्थित विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरातील दीक्षांत सभागृहात आज रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री श्री. लोढा बोलत होते.
रोजगार मेळाव्याला प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, प्र कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, राज्यपालनामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूरचे उपायुक्त प्रकाश देशमाने, सहआयुक्त सुनंदा बजाज, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन यांची उपस्थिती होती.
कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसून प्रत्येक कामाचा स्वीकार करावा, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी पुढे बोलताना केले. महाराष्ट्र तसेच देशात रोजगाराची कमी नाही. मात्र, महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना पसंतीचा रोजगार मिळत नाही. कौशल्य अभाव असल्याने पीछेहाट होते. श्रमाचा सन्मान होण्याची गरज आहे. त्यामुळेच नळ कारागिराला ‘वॉटर इंजिनियर’चे नाव देण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना कौशल्य युक्त केले तर यांच्यामधून मोठे उद्योजक तयार होतील आणि भारत विकसित होईल असे श्री लोढा म्हणाले.
इच्छा तेथे मार्ग – कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे
इच्छा असेल तर मार्ग सापडतात रोजगाराचा मार्ग तयार करण्यात विद्यापीठ मदत करीत असल्याचे प्रतिपादन प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांनी केले. उद्योजकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकास करावा, त्यांच्या कौशल्यातून कंपनीचा पर्यायाने भारताचा विकास होईल असे त्या यावेळी म्हणाल्या. विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘विद्यार्थी ॲप’ बाबत माहिती देत ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळावी याकरिता या रोजगार मिळाव्याचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूरचे उपायुक्त प्रकाश देशमाने यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सहआयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी रोजगार मेळाव्याच्या स्वरूपाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले तर आभार रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ भूषण महाजन यांनी मानले. रोजगार मेळाव्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सहभागी उद्योजक
रोजगार मेळाव्यामध्ये ॲक्सिस बँक, इंडोरामा, टाटा तनिष्क, लाईट हाऊस सिस्टीम, निको अलाॅय, करण कोठारी ज्वेलर्स, स्मार्ट हायजीया प्रायव्हेट लिमिटेड नागपूर, द युनिव्हर्सल ग्रुप असोसिएट नागपूर, मंशा टूर्स प्रायव्हेट लिमिटेड, वैभव इंटरप्राईजेस नागपूर, टाटा स्ट्राईव्ह एक्सटेन्शन सेंटर वाडी नागपूर, ईराॅस मेटल वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड, महाचाय प्रायव्हेट लिमिटेड नागपूर, एलआयसी ऑफ इंडिया, टाइम प्रो इव्हेंट अँड एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड यासह विविध कंपन्या या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी झाल्या.
रोजगार मेळाव्याकरिता 19 कंपन्या तसेच 323 उमेदवार उपस्थित होते.