महापुरुषांचे विचार आचरणात आणल्यास खरे परिवर्तन घडेल- वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

मंत्रालयात महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव

मुंबई, दि. २७ : आजच्या आधुनिक युगात महापुरुषांच्या विचारधारेतूनच आपल्याला सामाजिक समतेचा, न्यायाचा मार्ग सापडतो. महापुरुषांचे विचार केवळ स्मरणात न ठेवता, प्रत्यक्ष आचरणात आणल्यास खरे परिवर्तन साधता येईल, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले

मंत्रालयात महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रम झाला. या महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा थोर समाजसुधारक व विचारवंतांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे व पदाधिकारी उपस्थित होते.

वस्त्रोद्योग मंत्री श्री. सावकारे म्हणाले, महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव अतिशय चांगली संकल्पना आहे. या माध्यमातून महापुरुषांच्या कार्याचे स्मरण केले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमी शोषित वर्गासाठी न्याय, समानता आणि शिक्षण यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला.

मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमात मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच विविध विभागातील मान्यवर उपस्थित होते.

अनु. जाती, जमाती, विजा-भज, इ.मा.व., वि. मा.प्र शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी संघटनेच्यावतीने महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सव २०२५ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

0000

मोहिनी राणे/ससं/