मुंबई, दि. २७ : प्रकल्पग्रस्त व स्थानिक नागरिकांच्या पाल्यांना बृहन्मुंबई , ठाणे, नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील खासगी कंपनीत प्राधान्याने नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.
प्रकल्पग्रस्त कोळी समाजाच्या पाल्यांना खासगी कंपन्यात नोकरी उपलब्ध करून देण्यासंदर्भात तसेच पुणे येथील कुरकुंभ एमआयडीसी येथील कामगारांच्या समस्यांबाबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार राहूल कुल, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष चंदू पाटील, प्रधान सचिव आय.ए.कुंदन, कामगार आयुक्त डॉ. एच.पी.तुम्मोड, उपसचिव स्वप्नील कापडणीस, अपर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ, संघटनेचे डॉ. रूपेश कोळी, हेमंत वैती, माथाडी मंडळाचे अध्यक्ष निखील वाने आदीसह अधिकारी उपस्थित होते.
कामगार मंत्री आकाश फुंडकर म्हणाले की, कोकण विभागात १६,४४३ कारखाने कार्यरत असून त्यामध्ये १३ लाख ११ हजार ६२९ कामगार कार्यरत आहेत. उद्योग विभागाच्या तरतुदीनुसार राज्यातील रहिवासी असणाऱ्या पात्र स्थानिकांना पर्यवेक्षणीय श्रेणीत ५० टक्के तर इतर श्रेणीतील ८० टक्के खासगी उद्योगात रोजगार देण्यात येतो. यानुसार संबंधित खासगी कंपन्यांमध्ये स्थानिकांना नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न करेल.
‘एमआयडीसी’त सुरक्षा नियमांचे पालन न झाल्यास कारवाई करण्याचे निर्देश
पुणे येथील कुरकुंभ एमआयडीसी क्षेत्रातील औषध निर्मिती क्षेत्रातील तसेच रासायनिक उद्योग क्षेत्रातील कंपन्याना तातडीने भेटी देऊन अहवाल सादर करावा. सुरक्षिततेचे नियम न पाळणाऱ्या कंपन्या, प्रदुषण करणाऱ्या कंपन्यांवर करण्यात येणाऱ्या कारवाईचाही अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी श्री. फुंडकर यांनी दिले.
०००
श्रद्धा मेश्राम/विसंअ/