उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन संपन्न

नूतन इमारतीद्वारे लोकाभिमुख आणि कल्याणकारी काम करावे - उपमुख्यमंत्री

ठाणे,दि.18(जिमाका):- नागरिकांना चांगली सेवा द्यायची आहे तर आपल्या सगळ्यांना प्रशस्त प्रशासकीय कार्यालय पाहिजे. चांगलं भव्य दिव्य असं कार्यालय पाहिजे, कारण आपल्याला तिथून लोकांना सेवा द्यायची आहे. ही फक्त एक इमारत नसून या इमारतीमध्ये आपण जे काम करणार आहोत ते काम लोकाभिमुख आणि कल्याणकारी असेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

कल्याण शहरातील नविनतम आणि अद्ययावत सोयी-सुविधांनी परिपूर्ण अशा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, कुमार आयलानी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल, परिवहन विभागाचे अधिकारी-कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आजचा दिवस कल्याण-डोंबिवलीच्या इतिहासातला सुवर्णाचा आणि आनंदाचा दिवस आहे. एक मोठी वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे. हा परिवहन विभाग खऱ्या अर्थाने आपल्या राज्याच्या हिताचा आणि राज्याच्या विकासाचा कणा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आरटीओ विभाग राज्याला महसूल देणारा एक महत्त्वाचा विभाग आहे. म्हणूनच प्रताप सरनाईक यांनी मंत्रीपदाची धुरा हाती घेतल्यानंतर सगळीकडे भेटी द्यायला सुरुवात केली, एक परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळाले. या ठिकाणी आपले जे कर्मचारी आहेत व परिवहन सेवेचे एसटी ड्रायव्हर, कंडक्टर किंबहुना आरटीओ विभागाचे अधिकारी-कर्मचारी आहेत त्यांना देखील सुविधा देण्याचं काम हे राज्य सरकारचं आहे आणि म्हणून जे जे काय आपल्याला सहकार्य लागणार आहे ते पूर्णपणे सहकार्य राज्य सरकारकडून मिळेल.

ते पुढे म्हणाले की, आपण खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चांगलं काम करताय आणि मला आठवतंय की, गेल्या अडीच वर्षांमध्ये आपल्या महायुती सरकारने एवढे जलद निर्णय घेतले आणि त्या टीममध्ये देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ही आमची एक टीम आहे आणि आमची ही टीम पूर्वीच्या गती पेक्षा अधिक वेगवान गतीने पुढचाही कारभार करणार आहे. नागरिकांना चांगली सेवा द्यायची आहे तर आपल्या सगळ्यांना प्रशस्त प्रशासकीय कार्यालय पाहिजे. चांगलं भव्य दिव्य असं कार्यालय पाहिजे, कारण आपल्याला तिथून लोकांना सेवा द्यायची आहे. ही फक्त एक इमारत नसून या इमारतीमध्ये आपण जे काम करणार आहोत ते काम लोकाभिमुख आणि कल्याणकारी असेल.

आपण आता सगळं स्मार्ट पद्धतीने करताय, नवीन टेक्नॉलॉजी आहे, आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतोय आणि या माध्यमातून देखील मग आता परवाना देण्याचं काम देखील पूर्वीसारखं नसून तुम्ही आता परवाना देताना त्यामध्ये देखील नवीन टेक्नॉलॉजी आणताय. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज होणारे अपघात टळतील, असे सांगून ते पुढे म्हणाले की, नाशिक मध्ये एका अपघातात 25 लोक मृत्युमुखी पडले होते आणि तेव्हा राज्यातले सगळे ब्लॅक स्पॉट काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले होते आणि त्यावर देखील तुमच्या विभागाने खूप चांगलं काम केले आहे आणि त्यामुळे अपघातांमध्ये देखील आपली संख्या आता कमी झालेली आहे.

उपमुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले की, आपली संस्था जगली पाहिजे वाढली पाहिजे आणि त्याचा फायदा लोकांना मिळाला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून आपल्याला काम करायचं आहे आणि खऱ्या अर्थाने इज ऑफ बिजनेस आणि इज ऑफ लिविंग ही आपल्या राज्याची प्रमुख भूमिका आहे आणि आपल्या माध्यमातून देखील याच्यामध्ये वाढ होण्यास मदत होईल आणि नागरिकांना देखील त्याचा फायदा मिळेल. एसटीला आपण लाईफ लाईन म्हणतो. पहलगाम मध्ये जेव्हा आपल्या निरपराध लोकांना गोळ्या घालून मारण्यात आलं, त्यांच्या नातेवाईकांना आपण विमानाने इकडे आणलं आणि पुढं परिवहनच्या बसेसने आपण त्यांच्या त्यांच्या गावी सोडलं हे देखील परिवहन सेवेने त्यावेळेस केलेले काम खऱ्या अर्थाने जनसेवेचे आणि लोकभावनेचे आहे.

आपल्याला आता आपला वेग वाढवायचा आहे, आपल्या लोकांना सेवा द्यायची आहे आणि खऱ्या अर्थाने परिवहन विभाग आणि आरटीओ विभाग हे दोघांचे एकमेकांशी एवढी सांगड आहे की, एकमेकांना परिपूर्ण असा हा विभाग आहे असे सांगून ते म्हणाले की, आपण नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सेवा दिल्या पाहिजे. यामध्ये ई-गव्हर्नन्सचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रम घेतला, आता दीडशे दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रम घेतलेला आहे. त्याच्या माध्यमातून भूमिका सरकारची एवढीच आहे की इज ऑफ लिविंग म्हणजे सगळ्यांचे जीवन सुलभ झाले पाहिजे, त्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. त्यांना मंत्रालयापर्यंत चकरा माराव्या लागू नयेत व त्यांचं काम जिल्हास्तरावर / तालुकास्तरावर झालं पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, आपण जे नवनवीन उपक्रम हाती घेतोय त्याच्या मागचा उद्देश शेवटच्या माणसाला आपली चांगली सेवा देणे हा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये लायसन्स, परमिट, रिन्यूअल अशा गोष्टी ज्या आहेत त्या तत्परतेने झाल्या पाहिजेत. लोकांना त्यासाठी विलंब लागता कामा नये, त्याचा निपटारा लवकरात लवकर झाला पाहिजे आणि प्रलंबित कामे शून्यावर आणली पाहिजे, यासाठी आपण वेगाने काम करा त्यासाठी सिस्टीमही आपल्याकडे आहे. मी पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो या भव्य दिव्य अशा इमारतीमधून तुमच्याकडून जास्तीत जास्त कार्यक्षम काम होईल, पारदर्शकता येईल आणि नागरिकांना चांगली सेवा मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, योगायोग बघा आज या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणारे आणि सर्वसामान्य प्रवाशांना चांगली सुविधा देणाऱ्या पाच रिक्षा चालकांचा सत्कार झाला. आज त्यांचा सत्कार करताना मला आठवतंय की, साधारण 80 ते 90 च्या दशकात मी सुद्धा डोंबिवलीमध्ये रिक्षा चालक म्हणून काम करत असताना ह्याच कल्याणच्या परिवहन कार्यालयाने रिक्षा चालकाचा पहिला परवाना मला दिला होता. आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या राज्याचा परिवहन मंत्री म्हणून माझ्या उपस्थितीमध्ये या इमारतीचे उद्घाटन होत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज या कार्यालयाचा शुभारंभ होतोय. गेल्या अडीच वर्षांमध्ये आपण मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगलं काम झाले आहे. आरटीओची अनेक कार्यालये आपण निर्माण केलीत. विभागाच्या अनेक मोक्याच्या जागा ज्या झोपडपट्ट्यांनी सगळ्या जागा व्याप्त झालेल्या आहेत त्या शिंदे साहेबांना विनंती केली आहे की ज्या आमच्या 54 विविध ठिकाणी चांगल्या जागा ज्या आहेत, त्या परत कोणी घेऊ नये यासाठी आम्ही सुद्धा पीपीपी तत्त्वावरच त्या जागा विकसित करू जेणेकरून आमच्या विभागाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल.

ते पुढे म्हणाले की, पूर्वी आपण लायसन्स देत होतो ते म्यानुअली देत होतो आणि आपण आता ते ट्रॅकच्या माध्यमातून जे लायसन्स देणार आहोत, त्यामुळे रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे आणि त्या माध्यमातून अतिशय चांगलं काम परिवहन सेवेमध्ये करता येईल. एक गोष्ट मला अभिमानाने सांगावीशी वाटते की गेली ८५ वर्षे परिवहन विभाग या राज्यातील जनतेला अविरत सेवा देत आहे. महिन्याभरापूर्वीच वरळीला अतिशय चांगल्या प्रकारच्या परिवहन कार्यालयाचे सुद्धा भूमिपूजन केले आहे. ती इमारतही दोन ते अडीच वर्षांमध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे एआय टेक्नॉलॉजीवर आधारित आपण चांगला विकास करतोय, चांगले निर्णय घेतोय आणि परिवहन सेवेला कशी बळकटी देता येईल आणि जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांना कशा सुविधा उपलब्ध करून देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आजही सगळे लोकं हे सांगतात की, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे परिवहन सेवा असताना त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्या चांगल्या विकासकामांना त्यांनी चालना दिली होती ते आज पर्यंतच्या इतिहासामध्ये कधी घडलं नव्हतं, तेवढं एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकाळात घडले आहे. या निमित्ताने मी ग्वाही देतो की, पुढल्या काही वर्षांमध्ये अजून चांगली सेवा या राज्याला देण्यासाठी परिवहन सेवा कटिबद्ध आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने रस्ता सुरक्षा या विषयावरील पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे हेमंगिनी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी केले.

00000