शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन करा – रोहयो मंत्री भरत गोगावले

रायगड जिमाका दि. १६– रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे तिथी व तारखेनुसार अनुक्रमे ६ व ९ जून रोजी आयोजन करण्यात आले आहॆ. या कार्यक्रमाच्या नियोजनाची रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रमुख विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी सर्व यंत्रणेला दिल्या.
महाड शासकीय विश्रामगृहात आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके यांसह विविध विभागाचे अधिकारी व कोकणकडा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा आपल्या अस्मितेचा विषय आहॆ. गेली ३५ वर्ष हा उत्सव सुरु आहॆ. या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहॆ.  त्यामुळे हा कार्यक्रम सुनियोजित व सुव्यवस्थितपणे पार पडण्याची जबाबदारी सर्वांवरच आहे. तेव्हा प्रत्येकाने आपले काम चोखपणे करावे.
शिवभक्तांना सर्व सोयी सवलती विहित मुदतीत उपलब्ध करून द्याव्यात त्यामध्ये कुठलेही हयगय करू नये असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यंदा मान्सून लवकर सुरु झाला आहॆ. त्यामुळे पावसाची शक्यता लक्षात घेऊन मंडप, भोजन, विद्युत आणि आरोग्य व्यवस्था तैनात ठेवाव्यात. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वैद्यकीय पथक सुसज्ज ठेवावे, गडावर पुरेश्या प्रमाणात वैद्यकीय पथक, स्ट्रेचर, औषधसाठा ठेवावा. विशेषता सर्पदंश होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याप्रमाणे औषधे उपलब्ध ठेवावीत. जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम नियोजनासाठी गठीत केलेल्या समित्यानी आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असेही श्री गोगावले यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले की, शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने वेगवेगळ्या समित्याची नेमणूक केली आहे. मुख्यत्वे आरोग्य,पाणी पुरवठा, मंडप, खानपान, राजशिष्टाचार, परिवहन, विद्युत, पाणी आणि शौचालय आदी सर्व समित्यांची नेमणूक केली आहॆ. सर्व नियोजन सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
या बैठकीत सर्व समित्यानी केलेल्या कामाचा आढावा सादर केला. तसेच कोकण कडा मित्र मंडळाने देखील आवश्यक बाबीबाबत सूचना केल्या.