राष्ट्रीय लोक न्यायालयात ७०४ कोटींची प्रकरणे निकाली

मुंबई, दि. १३ : नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय मुंबई, सहकारी अपिलीय न्यायालय, डीआरटी कुलाबा व मोटार अपघात दावा प्राधिकरण, मुंबई येथे राष्ट्रीय लोक न्यायालय १० मे रोजी पार पडले. या लोक न्यायालयात ७५ पॅनल नेमण्यात आले होते. ज्यामध्ये ९०२२ प्रलंबित प्रकरणे व ४२७४ दाखल पूर्व प्रकरणे अशी एकूण १३२९६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या सर्व निकाली प्रकरणाचे एकूण मूल्य ७०४ कोटी रुपये आहे.

राष्ट्रीय लोक न्यायालयाची सुरूवात नगर दिवाणी व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम, मुंबई वकील संघाचे सचिव ॲड आसिफ नकवी, पक्षकार व विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षाला जलार्पण करुन झाली. यावेळी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी नुकतेच प्रकाशित केलेल्या मराठी गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ५ मे ते ९ मे या काळात राबविलेल्या विशेष अभियानात मुंबई मुख्य न्याय दंडाधिकारी एम.आर.ए. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील सर्व न्यायदंडाधिकारी न्यायालयातील एकूण ४२०६ प्रलंबित खटले निकाली काढण्यात आली. लोकन्यायालय यशस्वी करण्याकरिता सर्व न्यायालयातील न्यायिक अधिकारी, मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव अनंत देशमुख व न्यायालयातील कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

०००

निलेश तायडे/विसंअ/