खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
सातारा दि.10 : भारतीय हवामान विभागाने 103 टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे खरीपातील पेरणीचे क्षेत्र वाढणार आहे. या हंगामात बोगस बियाणे व खतांचा पुरवठा होणार नाही याची दक्षता घ्यावी व त्यासाठी तपासणीसाठी भरारी पथाकांची स्थापना करावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक-2025 पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे (दूरदृष्य प्रणाली) जिल्हाधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, विभागीय कृषी सहसंचालक अजय कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.
खंरीप हंगामामध्ये बियाणे व खतांचा तुटावडा भासणार नाही याची कृषी विभागाने दक्षता घ्यावी, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, कृत्रिम बुद्धमेच्या माध्यमातून हेक्टरी ऊसाचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत. या तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती द्यावी. जिल्ह्यात फळबाग लागवड वाढावी यासाठी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ द्यावा. दुष्काळी तालुक्यात डाळींब व पाटण तालुक्यात आंबा पिकांच्या वृक्षांचे वाटप करावे.
सेंद्रीय शेती आता काळाची गरज बनली आहे. सेंद्रीय शेती करण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करावे याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी. सेंद्रीय कृषी मालाला बाजारपेठेत खूप मागणी असून ग्राहक या मालाला चांगला दरही देत आहेत. खंरीप हंगामात पिक कर्जाबाबत प्रत्येक बँकांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. ज्या बँका उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत अशा बँकांवर कार्यवाही करावी. तालुकास्तरावर आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली खंरीप हंगाम बैठका घ्या. त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्या तक्रारींचा बैठकीतच निपटारा करा, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती फरांदे यांनी खंरीप हंगाम 2025 मध्ये करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सातारा यांच्या अधिनस्त असणारी उपविभागीय कृषी अधिकारी, सातारा, कराड व वाई तसेच तालुका कृषी अधिकारी, सातारा, खटाव, कराड, पाटण वाई व जावळी ही कार्यालये आयएसओ मानांकित ठरली आहेत या कार्यालयांना पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते आयएसओ मानांकन प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.