मुंबई, दि.9 : एचआयव्ही प्रतिबंध आणि उपचार क्षेत्रात समुदाय स्तरावरील उद्दिष्टे व कार्यक्रमांच्या पलीकडे जाऊन प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायक यांनी केले.
एचआयव्ही प्रतिबंध आणि उपचार क्षेत्रात महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीने ७ मे २०२५ रोजी नवी मुंबई येथे ‘NACP-V’ अंतर्गत कार्यशाळा आयोजित केली. भविष्यातील कार्यपद्धती, अडथळे आणि त्यावरचे उपाय यावर लक्ष केंद्रित करून पुढील वाटचालीचा नवा मार्ग आखण्यात आला.
राज्यातील सुविधास्तरावरील १४० अधिकारी आणि कर्मचारी ( वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा पर्यवेक्षक, सामाजिक संस्था, पार्टनर इ.) आणि ‘महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी’ चे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यशाळेत मुख्य NACP-V अंतर्गत चालू असलेल्या व नियोजित उपक्रमांची स्थिती जाणून घेणे, त्या अनुषंगाने सेवांमध्ये करावयाच्या सुधारणा याबाबत सर्व उपस्थितांचे मत जाणून घेण्यात आले. उपस्थितांना गटामध्ये विभागण्यात आले. प्रत्येक गटामध्ये आठ ते नऊ अधिकारी व कर्मचारी यांचे 17 गट बनविण्यात आले. गटचर्चा करतांना, एचआईव्ही /एड्स आजाराबाबत सादर करण्यात येणाऱ्या विविध रिपोर्ट्सची अचूकता, सद्यस्थिती, जोखीमग्रस्त कुणाला म्हणायचे तसेच गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी करावयाची कार्यवाही या विषयांवर सखोल विचारमंथन करण्यात आले.
एचआयव्ही/एड्सचा धोका कोणाला नाही किंवा असुरक्षित घटक कोण आहेत?, अंदाजे किती टक्के आरोग्य संस्थांमध्ये दर्जेदार एसटीआय / आरटीआय सेवा मिळतात?, किती टक्के एचआयव्ही सह जगणारे हे एआरटी पासून सुटतात?, NACP-V अंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्राची प्रगती ० ते १० या मापदंडामध्ये किती झाली असे तुम्हाला वाटते?, एचआयव्हीसह जगत आहेत (एचआयव्ही पॉझिटिव्ह) परंतु, आरोग्य यंत्रणेकडे त्याची नोंद नाही अशा लोकसंख्येचा अंदाजे आकडा किती आहे?,मुद्द्यांवर गटामध्ये चर्चा झाली त्यानंतर गटांचे सादरीकरण झाले.
या सादरीकरणामधून एचआयव्हीचा बदलता कल आणि वयोगट समजला. राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. मात्र, अद्यापही काही क्षेत्रांमध्ये लोकांपर्यंत माहिती व सेवा पोहोचविण्याचे आव्हान कायम आहे. त्यामुळे ‘९५-९५-९५’ या राष्ट्रीय उद्दिष्टाकडे वाटचाल करताना सुसंगत व सामूहिक प्रयत्नांची नितांत गरज असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
कार्यशाळेसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सचिव डॉ. निपुण विनायक, डॉ. सुनील भोकरे, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक डॉ. विजय कंदेवाड, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ.विजय करंजकर आदी उपस्थित होते