मुंबई, दि. ९ :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षांमध्ये २५ हजार बसेस घेण्यात येणार आहेत. सन २०२५-२६ पासून उर्वरित २० हजार बसेस या पर्यावरणपूरक अशा सीएनजी व एलएनजीसारख्या इंधनाबरोबर डिझेल इंधन हायब्रिड करून चालणाऱ्या असतील. डिझेल इंधनाचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थितीत केला जाईल, जेणेकरून बस प्रवाशांची गैरसोय होणार नाही, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते पर्यावरणपूरक इंधनाच्या संदर्भात बोलावलेल्या एसटी अधिकारी व संबंधित इंधन पुरवठादार संस्थांच्या बैठकीमध्ये बोलत होते.
मंत्री श्री.सरनाईक म्हणाले, एसटीकडे बहुतेक सर्व बसेस डिझेल इंधनावर चालणाऱ्या आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चा पैकी सुमारे ३४ टक्के खर्च हा इंधनावर होतो. दररोज सुमारे १० लाख ७० हजार लिटर इतके डिझेल लागते. वर्षाला सुमारे ३४ हजार कोटी रुपये इंधनावर खर्च होतो.
भविष्यात डिझेल इंधनाची उपलब्धता व वारंवार होणारा दरातील बदल लक्षात घेता, पर्यायी इंधन वापरणे आवश्यक आहे. सीएनजी आणि एलएनजी हे पर्यायी इंधन प्रकार तुलनेने डिझेलपेक्षा स्वस्त असून पर्यावरणपूरक देखील आहेत. तसेच या इंधनाची कार्यक्षमता चांगली असल्याने बस प्रति लिटर ५-५.५ किलोमीटर अंतर कापते. डिझेल इंधनावर मात्र बस प्रति लिटर केवळ ४ किलोमीटर अंतर कापते. सहाजिकच एलएनजी व सी एन.जी. इंधन वापरल्यास इंधनावरील खर्चात बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. पुढील वर्षीपासून घेण्यात येणाऱ्या नव्या २० हजार बसेस हायब्रीड इंधनावर चालणाऱ्या घेण्यात येणार आहेत.
एलएनजी इंधनावर २० टक्के सूट
एसटी महामंडळाने यापूर्वी किंग्ज गॅस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी सोबत केलेल्या करारानुसार एलएनजीइंधन हे तत्कालीन डिझेल इंधनाच्या किमतीच्या २० सूट कमी दराने पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याच्या खर्चात दरवर्षी २३५ कोटी रुपयांची बचत होणार आहे.
राज्याभरात ९० ठिकाणी एलएनजी चे पंप उभारले जाणार आहेत. तसेच महानगर गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे सीएनजी चे २० पंप उभारले जात आहेत. त्यामुळे भविष्यात इंधन पुरवठ्याची व्यवस्था होणार आहे. या दोन्ही इंधना सोबत डिझेल इंधनावर चालेल अशी हायब्रीड बसेस तयार करण्याचे प्रस्ताव बस मॅन्युफॅक्चर कंपन्याकडून मागविण्यात आले आहेत. भविष्यात एसटीच्या तफ्यात या दोन इंधनावर चालणाऱ्या हायब्रीड बसेस घेण्याचा एसटीचा मानस असल्याचे मंत्री श्री.सरनाईक यांनी सांगितले.
0000
शैलजा पाटील/विसंअ