मुंबई, दि. ८ : सिंगापूरच्या शिक्षण प्रणालीमध्ये देशप्रेमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देताना ते देशाचे उत्कृष्ट नागरिक कसे घडतील याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. त्याप्रमाणेच आपण देखील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वच्छता आणि शिस्त रुजवून ते भविष्यात सुजाण नागरिक घडतील, यावर भर देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. सिंगापूर अभ्यास दौऱ्यातील शिक्षकांच्या गटांने अभ्यासपूर्ण सादरीकरण केल्याबद्दल श्री.भुसे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणामध्ये होत असलेले विविध बदल तसेच राबविण्यात येणाऱ्या वैविध्यपूर्ण व नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ४८ शिक्षकांचा अभ्यास दौरा नुकताच सिंगापूर येथे आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यामध्ये सहभागी शिक्षकांनी जाणून घेतलेल्या तेथील शिक्षण व्यवस्थेच्या अनुषंगाने केलेल्या अभ्यासाचे मुद्देनिहाय सादरीकरण शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आयोजित चर्चासत्रात करण्यात आले. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि शिक्षक यावेळी उपस्थित होते.
प्रतिकूल परिस्थितीत समर्पित भावनेने मार्गक्रमण करणाऱ्या शिक्षक आणि संस्थांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे सांगून इतरांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन श्री.भुसे यांनी केले. शिक्षक ज्या प्रयोजनासाठी सिंगापूरला गेले होते, तो हेतू साध्य झाल्याबद्दल समाधान व्यक्त करुन शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे कमी करताना शासनाने शाळास्तरावर केवळ चार समित्या ठेवल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रधान सचिव श्री.देओल म्हणाले, सिंगापूरची शैक्षणिक व्यवस्था आणि आपल्या देशाचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जवळपास सारखे असल्याचे दिसून येत असून शिक्षकांनी दैनंदिन अध्यापनात अनुभवात्मक शिक्षण पद्धतीचे प्रमाण वाढवावे. शिक्षण परिषदांमध्ये उपक्रमशील शिक्षकांनी इतर शिक्षकांना त्यांच्या शाळेत नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी प्रेरित करावे. सिंगापूर अभ्यास दौऱ्यातील शिक्षकांच्या अनुभवानुसार आपल्या शैक्षणिक धोरणात बदल करण्याबाबत विचार केला जाईल, असे सांगून निपुण महाराष्ट्र अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्यास राष्ट्रीय संपादणूक पातळीत प्रगती दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राचा शिक्षण क्षेत्रातील वारसा राखण्यासाठी आपल्याला अध्ययन-अध्यापन पद्धतीत नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावे लागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री.रेखावार म्हणाले, सिंगापूर अभ्यास दौऱ्याचे सादरीकरण अभ्यास दौऱ्यातील सर्व शिक्षकांना आपल्या शाळेत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी उद्युक्त करेल. सिंगापूरच्या शिक्षण व्यवस्थेच्या धर्तीवर शिक्षकांनी आपल्या अध्यापनात बदल केल्यास, त्याचे सकारात्मक दृश्य परिणाम नजिकच्या काळात दिसून येतील, असे ते म्हणाले.
श्री.यादव यांनी प्रास्ताविकात नाविन्यपूर्ण शैक्षणिक पद्धती, यशस्वी प्रशासकीय पद्धती, जागतिक स्तरावरील विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, ऐतिहासिक, भौगोलिक वातावरण आदींचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन नवीन दृष्टीकोन स्वीकारणे, स्वत:च्या राज्यात, जिल्ह्यात, कार्यालयात, शाळेत नवीन शैक्षणिक व प्रशासकीय बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे हा या सिंगापूर अभ्यास दौऱ्याचा उद्देश असल्याचे सांगितले. सिंगापूर अभ्यास दौऱ्याचे नेतृत्व करणाऱ्या सहायक संचालक श्रीमती सरोज जगताप यांनी दौऱ्यातील अनुभव कथन केले. उपसचिव तुषार महाजन यांनी सर्वांचे आभार मानले.
00000