मुंबई, दि. ८ : आश्रमशाळांच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न होत असतात. त्यामुळे इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या विमुक्त जाती आणि भटक्या जमाती (विजाभज) प्रवर्गाच्या निवासी आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येणार असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या खासगी अनुदानित निवासी आश्रमशाळांतील अडचणींबाबत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच निवासी आश्रमशाळाचे संस्थाचालक उपस्थित होते.
मंत्री श्री. सावे म्हणाले, आश्रम शाळांच्या प्रलंबित अनुदानाचे वितरण टप्प्याटप्प्याने लवकरच करण्यात येईल. संचमान्यताबाबत शिक्षण विभागासोबत बैठक घेण्यात येईल. संचमान्यता व वेतन अनुदानासाठी प्रस्ताव तयार करावेत संचमान्यता प्रक्रियेनंतरच रिक्त पदांची यादी तयार करावी. आश्रम शाळांच्या संस्थाचालकांनी मांडलेल्या समस्या सोडविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. शासनाच्या सीएमश्री योजनेत आश्रमशाळांचा समावेश करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या तसेच आश्रम शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांचे आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्यावे. तसेच विद्यार्थ्यांसाठी राज्य, विभाग आणि जिल्हास्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीत आश्रमशाळेत महिला अधीक्षकांची नियुक्ती, रिक्त पदांची भरती, आश्रम शाळांमध्ये सौरऊर्जेचा वापर, सीएमश्री योजनेत समावेश, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, आश्रमशाळा संहिता याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
00000
शैलजा पाटील/विसंअ/