प्रत्येक नागरिकाने आपत्ती व्यवस्थापन आणि बचावाचे धडे घ्यावेत – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई दि. ८ : आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. आपत्ती मानव निर्मित असो किंवा नैसर्गिक याचे व्यवस्थापन आणि बचाव कसा करावा, याचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाने घेतले पाहिजे, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील आयटीआयच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आपत्ती व्यवस्थापना विषयीच्या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ऑनलाईन आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा होणार आहेत.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, मानवाने प्रगती केली असली तरी, आपत्तीचे स्वरूप ही बदलले असून या पार्श्वभूमीवर बचावाचे प्रशिक्षण नव्या पिढीला देण्याचा उद्देश आहे. ‘आयटीआय’ मध्ये सहा नव्या अभ्यासक्रमाची घोषणा केली. यात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ईव्ही इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थापन, इंडस्ट्रिअल रोबोटिक्स आणि थ्री डी प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान, सोलर टेक्निशियन या अभ्यासक्रमांचा समावेश असून येत्या शैक्षणिक वर्षापासूनच याची सुरुवात होणार आहे.

दोन दिवसीय शिबिरात अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मंत्री यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. तर राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी आयटीआय विद्यार्थ्यांना नागरी संरक्षण या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतल्या शिबिराच्या सुरुवातीला डॉ. लीना गडकरी यांनी आपत्ती व्यवस्थापन संकल्पना सांगितली. या दोन दिवसीय शिबिरात बचाव आणि मदतकार्य याचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. मानवनिर्मित आपत्ती यात युद्धाचा समावेश असून त्या काळात घ्यायची काळजी, उपचार आणि बचाव यावरही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. बचावाची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी सादर केली. राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य श्रीमती. एस.एस. माने यांनी आभार व्यक्त मानले.

 

00000

संध्या गरवारे/विसंअ/