मुंबई, दि. ०६ : शासकीय कामात माहितीचे व्यवस्थापन, वेळेचे नियोजन, कामाचे निरीक्षण आणि अहवाल व्यवस्थापन करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध आहेत या टूल्सचा वापर केला तर नक्कीच शासकीय कामकाजात गतिमानता येईल, असे मत कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी व्यक्त केले.
प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” अंतर्गत मंत्रालयात परिषद सभागृह, ६ वा मजला येथे ‘तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर’ या विषयावर कृषी आयुक्त सुरज मांढरे आणि महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास नाईक यांचे व्याख्यान झाले. यावेळी महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथील निवासी आयुक्त आर. विमला यांसह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
कृषी आयुक्त सुरज मांढरे म्हणाले की, गुगल कीप, एव्हरनोट, मायक्रोसॉफ्ट वन नोट, गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स, क्लिकअप, मायक्रोसॉफ्ट टू डू, गुगल कॅलेंडर, गुगल शीट्स, टेलिग्राम याचा वापर करून आपले काम अधिक गतिमान करता येईल. टेक्नॉलॉजी ही अशी गोष्ट आहे जी कोणताही भेदभाव न करता सर्वांना एका समान पातळीवर आणते. शरीर, रंग, जात, धर्म यांचा फरक न बघता ती सर्वांना उपयुक्त ठरते.
मायक्रोसॉफ्ट वन नोट या टूल्सचा जर वापर केला तर शासनाचे अनेक प्रश्न सुटतील. पेन्सिल असलेले टॅबलेट कामकाजात खूप उपयुक्त आहेत. हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क वर भर दिला पाहिजे. शासनाचे काम करत असताना स्वतः देखील तंत्रज्ञान अवगत करणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास नाईक यांनी सांगितले की, तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास शासकीय कामकाज अधिक परिणामकारक व वेळेत पूर्ण होऊ शकते. टास्क मॅनेजमेंटसाठी ऐनी डू (Any Do) सारख्या अॅप्लिकेशन्सचा उपयोग करून कामाची नोंद ठेवता येते व एक्सल (Excel) चा उपयोग क्षेत्रीय स्तरावर डेटाचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त ठरते.
‘महाराष्ट्र सिव्हिल सर्विस’ संकेतस्थळाची माहिती देताना नाईक यांनी सांगितले की, या प्लॅटफॉर्मवर नागरिक कोणत्याही विभागासंदर्भात प्रश्न विचारू शकतात व अधिकाऱ्यांकडून थेट उत्तर मिळवू शकतात.
त्याचबरोबर, ‘महासंपर्क’ अॅप्लिकेशनच्या माध्यमातून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची माहिती सुलभपणे मिळू शकते, याबाबतची माहितीही त्यांनी यावेळी दिली. प्रशासकीय यंत्रणेत एखाद्या समस्येवर उपाय शोधणाऱ्या तंत्राची गरज आहे आणि यासाठी तंत्रज्ञान ही प्रभावी साधने उपलब्ध करून देते, असेही नाईक यांनी सांगितले.
महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या विविध योजनांची माहिती देत त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम व तंत्रज्ञान यांची सांगड घालण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
०००
संध्या गरवारे/विसंअ/