पुणे, दि. 5: राज्यातील मत्स्यव्यवसाय विभाग महत्त्वाचा विभाग असून हा विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी एकत्रिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. उत्पन्नवाढीसोबतच पश्चिम महाराष्ट्रातील मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात मत्स्यव्यवसाय विभागाची विभागस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी श्री. राणे बोलत होते.
बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त श्री. किशोर तावडे (भा.प्र.से.), विभागाचे प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे, विभागातील पाचही जिल्ह्यांचे सहायक आयुक्त उपस्थित होते.
श्री. राणे पुढे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात मत्स्य व्यवसायाला पूरक वातावरण असून या भागातील शेतकरी प्रगतशील आहेत त्यांचा या व्यवसायात सहभाग वाढविल्यास मत्स्य उत्पादन वाढू शकते. विभागातील अधिकाऱ्यांनी आपापसात समन्वय ठेऊन पारदर्शकपणे काम करावे. विभागाचे आर्थिक स्त्रोत वाढवून विभाग आर्थिक स्वावलंबी व मोठा झाला पाहिजे. यासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याबरोबरच एआय तंत्रज्ञानाचा वापर विभागात सुरू करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावेत.
आंध्र प्रदेश, केरळ या राज्यात सुरू असलेले मत्स्य उत्पादन वाढीसाठी उपक्रमांची माहिती घेऊन आपल्या राज्यात सुद्धा नवीन उपक्रम राबविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. आगामी काळात तलावातील गाळ काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेऊन सर्व तलावांमधील गाळ काढावेत. त्यामुळे निश्चितच मत्स्य उत्पादनात वाढ होईल. आता मत्स्य व्यवसायाचा समावेश शेती उद्योगात झाला असून या व्यवसायासाठी पाणी उपलब्ध करुन घेण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. मत्स्य उत्पादन भागातील पाण्यातील प्रदूषण दूर करण्यासाठी संबंधित विभागाशी संपर्क करुन पाणी शुद्ध कसे करता येईल यासाठी नियोजन करावे.
विभागातील ज्या जिल्ह्यांमध्ये मच्छी मार्केटसाठी जागा उपलब्ध नाही त्या जिल्ह्यांनी नवीन मच्छी मार्केटसाठी महानगरपालिकेकडून जागा उपलब्ध करुन घेण्यासाठी पाठपुरावा करावा. जुनी मच्छी मार्केट नादुरुस्त स्थितीत असल्यास त्यासंदर्भातील दुरुस्तीचे प्रस्ताव विभागामार्फत मंत्रालय स्तरावर सादर करावेत. कोल्ड स्टोरेजसह सर्व सुविधांचा समावेश प्रस्तावात असला पाहिजे. आलेल्या प्रस्तावांना मान्यता देऊन त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
तलावातील मासेमारीच्या ठेकेदारांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असून ठेकेदार स्वत: काम पाहतात का याची तपासणी करावी. जे ठेकेदार निकषात बसत नाहीत त्यांचे ठेके रद्द करावेत. नदी भागात मासेमारीच्या ठेक्यांबाबत धोरण निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. उजणी धरणातील अवैधरीत्या सुरू असलेली मासेमारी बंद करुन तेथील स्थानिक लोकांना व्यवसायासाठी प्राधान्य देण्यात यावे. उजणी धरणाची मत्स्य उत्पादन क्षमता चांगली असून तेथून उत्पादन कसे वाढेल यासाठी विभागाने लक्ष घालावे, असे त्यांनी सांगितले.
पुण्यातील हडपसर येथे चांगल्या प्रकारचे आधुनिक मत्स्यालय उभारण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आली.
बैठकीला पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.