राज्य शासन आणि ग्लोबल मीडिया क्षेत्रातील भागीदारांमध्ये वेव्हज् संमेलनाच्या माध्यमातून नवे पर्व

नेटफ्लिक्स, मोशन पिक्चर आणि  युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपच्या प्रमुखांबरोबर मुख्यमंत्र्यांची चर्चा

मुंबई, दि. ४  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नेटफ्लिक्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे इंडिया व साउथ एशियाचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी  देवराज सान्याल आणि मोशन पिक्चर असोसिएशनचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ल्स रिवकिन या दिग्गजांची भेट घेऊन माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील कौशल्य विकासासंदर्भात तसेच चर्चा केली.

राज्य शासन आणि आंतरराष्ट्रीय माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील प्रमुख संस्थांमध्ये झालेल्या भेटीमध्ये राज्याच्या सांस्कृतिक वारशाचा जागतिक स्तरावर प्रसार आणि कौशल्य विकासासाठी नवे मार्ग खुले होण्यासंदर्भात चर्चा झाली.

आगामी पाच वर्षात मनोरंजन क्षेत्रात भारताला संधी  – नेटफ्लिक्सचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सारंडोस

नेटफ्लिक्सचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सारंडोस यांनी यावेळी भारताला आगामी पाच वर्षांत मनोरंजन क्षेत्रात मोठी संधी असून भारत एक महत्त्वाचा बाजार होणार  असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रातील मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात कौशल्य विकासासाठी नेटफ्लिक्स आणि राज्य शासन यांच्यातील संभाव्य सहकार्याची चर्चाही यावेळी झाली. ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्ध कथा जगभर पोहचवण्यासाठी एकत्र काम करण्याच्या संधी विषयी यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि श्री. सारंडोस यांनी चर्चा केली. श्री सारंडोस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे कौतुक करत वेव्हज् (WAVES) शिखर संमेलन आयोजित केल्याबद्दल केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले.

वेव्हज् संमेलन मनोरंजन उद्योगासाठी महत्त्वाचे – देवराज सान्याल

दरम्यान, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे इंडिया व साउथ एशियाचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. देवराज सान्याल, अभिनेता-दिग्दर्शक व एक्सेल एंटरटेनमेंट चे संस्थापक फरहान अख्तर व  सहसंस्थापक आणि निर्माते रितेश सिधवानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. वेव्हज् (WAVES) संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करून

समाधान व्यक्त केले. तसेच हे संमेलन मनोरंजन उद्योगासाठी महत्त्वाचे ठरल्याचे यावेळी सांगितले.

राज्यात जागतिक दर्जाचा स्टुडिओ उभारण्यासंदर्भात मोशन पिक्चर बरोबर चर्चा

जागतिक पातळीवरील चित्रपट,  टेलिव्हिजन आणि स्ट्रिमिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मोशन पिक्चर असोसिएशनचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ल्स रिवकिन यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

श्री. रिवकिन यांनी 1913 मध्ये प्रदर्शित झालेल्या

पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट ‘राजा हरिशचंद्र’ ची आठवण काढत भारताच्या समृद्ध चित्रपट परंपरेचा गौरव केला.

महाराष्ट्रमध्ये जागतिक दर्जाचे स्टुडिओ उभारण्यासाठी

सहकार्याबद्दल  उभय मान्यवरांमध्ये चर्चा झाली. तसेच

निर्मात्यांसाठी प्रोत्साहन योजना व बौद्धिक संपदा हक्कांचे संरक्षण यावर लक्ष केंद्रित करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

वेव्हज (WAVES) संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला जागतिक मीडिया नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित करण्यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी घेतलेल्या भेटीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.