गेमिंग डिजिटल परिवर्तनाचा मुख्य घटक ठरेल

‘बिलियन डॉलर बेट्स पॉवरेड बाय लुमिकाई इन्व्हेस्टर विव्ह ऑन गेमिंग्स नेक्स्ट फ्रंटियर’ विषयावर चर्चासत्र

मुंबई दि. ०३ : गेमिंग हे करमणुकीचे माध्यम आहे. मनोरंजनासोबत, गेमिंग आता केवळ करमणूक नसून डिजिटल परिवर्तनाचा मुख्य घटक ठरत आल्याचे मत वेव्हज्‌ २०२५ मध्ये आयोजित वेव्हजएक्स या चर्चासत्रात मान्यवर तज्ज्ञांनी व्यक्त केले.

जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वेव्हज्‌-२०२५ समिटमध्ये वेव्हजएक्समध्ये ‘बिलियन डॉलर बेट्स पॉवरेड बाय लुमिकाई इन्व्हेस्टर विव्ह ऑन गेमिंग्स नेक्स्ट फ्रंटियर’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रात या क्षेत्रातील तज्ञ दीपेन पारीख, ओथमान अलहोकैल (othman alhokail), शिवानंद पारे यांनी सहभाग घेतला.

गेमिंग हे आता केवळ करमणुकीपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते जगातील सर्वात प्रभावशाली  कंटेंट फॉर्म बनले आहे. भारतातही गेमिंग क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. भारतात सध्या ५० कोटींपेक्षा अधिक मोबाईल गेमर्स आहेत. मजबूत डिजिटल पायाभूत सुविधांमुळे गेमिंगमध्ये गुंतवणुकीसाठी मोठा वाव आहे.

UPI मुळे भारतामध्ये डिजिटल व्यवहारांचे युग सुरु झाले आहे. डिजिटल परिवर्तनात UPI ने महत्त्वाची भूमिका बजावली असून UPI मुळे डिजिटल व्यवहार सुलभ झाला. भारतातील बहुसंख्य लोकसंख्या आता डिजिटल व्यवहारांमध्ये सहभागी होत आहे.

भारत हा गेमिंग उद्योगासाठी एक अतुलनीय संधी आहे. भारतात उच्च कार्यक्षमतेचे स्टार्टअप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर हे सर्व घटक उत्कृष्ट गेम डेव्हलपमेंटसाठी उपयुक्त ठरत आहेत. स्थानिक बाजाराच्या गरजा लक्षात घेऊन तयार होणारे गेम्स जागतिक स्तरावरही लोकप्रिय होतील, असे मत चर्चेत सहभागी मान्यवरांनी व्यक्त केले.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/