‘मॅजिकल महाराष्ट्र’ दालन प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू

डिजिटल दालनाची प्रेक्षकांवर मोहिनी

मुंबई, दि. ०३: एखाद्या परिषदेमध्ये किंवा महोत्सवामध्ये उभारलेल्या दालनात पुस्तिकेच्या रूपाने माहिती देण्याची प्रचलित पद्धत आहे. वेव्हज्‌ २०२५ मध्ये उभारलेल्या महाराष्ट्राच्या दालनाने ही परंपरा मोडीत काढली असून ‘मॅजिकल महाराष्ट्र’ या नावाने संपूर्णतः डिजिटल स्वरूपात उभारलेल्या या दालनाने येथे भेट देणाऱ्या प्रेक्षकांवर जादू केली आहे. या दालनाचे थ्रीडी डिजिटल प्रवेशद्वार आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराची शानदार झलक दाखवित आहे.

हे दालन विशेषत: मराठी चित्रपटांना समर्पित करण्यात आले आहे. गाजलेल्या मराठी चित्रपटांची माहिती येथे आधुनिक स्वरूपात प्रदर्शित करण्यात आली असून महाराष्ट्राच्या समृद्ध मनोरंजन वारशाची ही जादुई झलक मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये ऐकण्यासाठीही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये चित्रपटसृष्टीच्या प्रारंभापासून आजच्या गेमिंग आणि डिजिटल उत्क्रांतीपर्यंतचा मनोहारी प्रवास, नावाजलेले स्टुडिओज, मनोरंजन उद्योगात होत असलेल्या नाविन्यपूर्ण कल्पनांमधील बदलांचा वेध घेण्यात आला आहे.

मराठीचा वारसा

मूकपटांपासून ते आधुनिक उत्कृष्ट कलाकृतींपर्यंत महाराष्ट्राने देशाला अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपट दिले आहेत. या प्रदर्शनात मराठी सिनेमाच्या वारशाचा गौरव करण्यात आला आहे.

जागतिक दर्जाची निर्मिती

महाराष्ट्रात जागतिक दर्जाचे व्हीएफएक्स, अ‍ॅनिमेशन आणि पोस्ट-प्रॉडक्शन स्टुडिओ आहेत. गाजलेल्या चित्रपटांपासून ते ओटीटी मालिकांपर्यंत निर्मिती होत असलेल्या या स्टुडिओंची माहिती येथे देण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने निर्मिती झालेल्या आणि जागतिक स्तरावर गौरव प्राप्त झालेल्या चित्रपटांचा या प्रदर्शनात सन्मान करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैविध्य, शास्त्रीय संगीत, नृत्यापासून गणेशोत्सवासारख्या सणांपर्यंतची समृद्ध परंपरा जगप्रसिद्ध आहे. याबाबतही या दालनात विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

महाराष्ट्र डिजिटल क्रांतीच्या अग्रभागी आहे, येथे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सृजनशीलता यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. एआय-आधारित जाहिरातींपासून येथील क्रिएटिव्ह स्टुडिओजमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जाहिरात निर्मिती देखील करण्यात येते. यांच्यासह महाराष्ट्रातील चित्रीकरण स्थळांबाबतची माहिती या दालनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

सृजनात्मक उद्योगांना चालना देण्यात राज्य शासनाची भूमिका

चित्रीकरण सुविधांचा विकास, स्थानिक थिएटरचे समर्थन, कलाकृतींना अनुदान व प्रशिक्षण आदी माध्यमातून राज्य शासनाने मनोरंजन क्षेत्राच्या वाढीस सक्रिय चालना दिली आहे. या उपक्रमांमुळे महाराष्ट्र राज्य सृजनशील आणि सांस्कृतिक क्षेत्राचे भारतातील आघाडीचे केंद्र म्हणून ओळखले जाते.

लाईव्ह स्टुडिओ – एलईडी व्हॉल्यूम

आधुनिक चित्रपट निर्मितीच्या अग्रभागी, एलईडी वॉल्यूम तंत्रज्ञानाने चित्रपट निर्मितीच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवला आहे. मोठ्या हाय डेफिनिशन एलईडी स्क्रीनद्वारे वैविध्यपूर्ण वातावरण तयार करून, दिग्दर्शक प्रत्यक्ष सेटवर गुंतागुंतीच्या दृश्यांचे चित्रीकरण करू शकतात. या दालनात उभारलेले या चित्रीकरणाचे प्रात्यक्षिक नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/