स्पर्धात्मक युगात ‘एआय’चा वापर गरजेचा

‘चित्रपट निर्मितीत ए.आय. घडवित असलेले परिवर्तन’ या चर्चासत्रात तज्ज्ञांचा सूर

मुंबई, दि. ०३ : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (ए.आय.) टूल्सचा आता प्रत्येक क्षेत्रात वापर होत आहे. एआय टूल्स शिकण्यास अतिशय सोपे असून यापुढे प्रत्येक क्षेत्रात ‘एआय’चा वापर केल्यास आपल्या क्षेत्रात काम करणे सोपे जाईल, असे मत चित्रपट निर्मितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या निर्मात्यांच्या चर्चासत्रामधे व्यक्त करण्यात आले.

जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित ‘वेव्हज् परिषदे’मध्ये ‘चित्रपट निर्मितीमध्ये एआय घडवित असलेले परिवर्तन’ या विषयावर चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्रात व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष चैतन्य चिंचलीकर, न्यूरल गॅरेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार नाटेकर, चित्रपट निर्माता राघवेंद्र नाईक यांनी सहभाग घेतला.

चर्चासत्रात ‘एआय’चा चित्रपट निर्मितीतील वापराबाबत चर्चा करण्यात आली. ‘एआय’च्या सहाय्याने पटकथा, संवाद लिहिणे अधिक वेगवान बनले आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्हिज्युअल इफेक्ट्स अधिक वास्तवदर्शी आणि कमी खर्चात तयार करता येतात. ‘एआय’ च्या मदतीने संपादन प्रक्रिया, ऑडिओ आणि व्हिज्युअल डबिंग अतिशय सुलभ झाले असून अधिक भाषांमध्ये डबिंग करणे सुद्धा सहज शक्य झाले असल्याचे सहभागी निर्मात्यांनी सांगितले.

‘एआय’च्या कोणत्या टूलचा वापर करावा, याबाबत श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना चिंचलीकर यांनी अनेक टूल्स उपलब्ध असून ‘ए.आय.’चा वापर करताना सुरुवातीला मोफत उपलब्ध असलेल्या विविध टूल्सचा वापर करावा त्यातून आपल्याला सुलभ असणारी टूल्स विकत घ्यावे, असा सल्ला दिला.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/