आशय निर्मितीत भारत जागतिक स्तरावर उत्कृष्ट व्यावसायिक भागीदार बनण्यास सज्ज

‘लाईट्स, कॅमेरा, एक्सआर: व्हर्च्युअल प्रॉडक्शन इज रिशेपिंग ग्लोबल सिनेमा’ परिसंवाद

मुंबई, दि ०३ : जागतिक स्तरावर आशय निर्मितीच्या क्षेत्रात भारत एक उत्कृष्ट व्यावसायिक भागीदार म्हणून सज्ज असल्याचे प्रतिपादन  एव्हीजीसी-एक्सआर मंच, फिक्कीचे माजी अध्यक्ष अशिष कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित वेव्हज्‌ २०२५, दृकश्राव्य मनोरंजन समिट मध्ये ‘लाईट्स, कॅमेरा, एक्सआर: व्हर्च्युअल प्रॉडक्शन इज रिशेपिंग ग्लोबल सिनेमा’ (Lights, camera,xr how virtual production is reshaping global cinema ) या विषयावर आयोजित परिसंवादात कुलकर्णी बोलत होते.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जागतिक सिनेमा कशा पद्धतीने बदलत आहे या विषयावर चित्रपट दिग्दर्शक केतन मेहता, अशिष कुलकर्णी माजी अध्यक्ष, एव्हीजीसी-एक्सआर मंच, फिक्की यांच्यासह लायटस स्टुडिओ आणि ओटीटी अमेरिकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव खेरोर आणि ब्रायन निट्झकिन – सह-संस्थापक, ऑर्बिटल स्टुडिओज या तज्ज्ञांनी आपली मते मांडली. सत्राचे सूत्रसंचालन मीडिया तंत्रज्ञान नवोपक्रमक, लोनाकोचे संस्थापक सायमन इंग्रॅम यांनी केले.

सिनेसृष्टीत तंत्रज्ञानाचा झपाट्याने होणारा वापर सिनेमा निर्मितीच्या प्रत्येक टप्प्याला नवे वळण देत आहे. व्हर्च्युअल प्रॉडक्शन ही केवळ एक संकल्पना राहिली नसून, ती आता सर्जनशीलता, कार्यक्षमता आणि जागतिक सहकार्याचा नवा मार्ग ठरत असल्याचा सूर व्यक्त करत या विशेष सत्रात, जगभरातील तंत्रज्ञान आणि सिनेसृष्टीतील अग्रणी तज्ज्ञ राजीव खेरोर, ब्रायन निट्झकिन, आणि सायमन इंग्रॅम या वक्त्यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. यावेळी हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात कसे कार्य करते आणि ते सिनेमा निर्मितीला कशी दिशा देत आहे  यादृष्टीने व्हर्च्युअल प्रॉडक्शनच्या भविष्याच्या अनुषंगाने वक्त्यांनी आपले म्हणणे मांडले.

कुलकर्णी, म्हणाले की चित्रपट आणि इतर सर्व प्रकारच्या आशय निर्मितीसाठी भारत सर्वार्थाने सुयोग्य ठिकाण आहे. भारतीय हवामानामुळे जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात विविध सिनेमा व संलग्न क्षेत्रात निर्मितीसाठी उत्कृष्ट संधी आहे. भविष्यात येत्या पाच दहा वर्षांत भारत व्हर्चुअल निर्मितीमधील एक महासत्ता बनेल. केंद्र सरकार यासाठी पाठिंबा देत आवश्यक सहकार्य करत आहेत, त्यामुळे गेल्या दहा वर्षांत भारतात निर्मिती प्रकल्पाच्या प्रमाणात वाढ होत आहे.

चित्रपट दिग्दर्शक केतन मेहता म्हणाले की, गोष्ट, कथा सांगण्याची समृद्ध परंपरा भारतात आहे. सकस आशय हा भारतीय सिनेमाचे वैशिष्ट्य राहिले आहे. त्यामुळे बदल्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या सृजनशीलतेला मोठे अवकाश प्राप्त होईल. त्याचा लाभ भारतीय कलाकार, तंत्रज्ञ यांनी अवश्य घेतला पाहिजे. हा आपल्या क्षमता सिद्ध करून त्या जागतिक पातळीवर पोहचवण्याचा काळ आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची उपयुक्तता सर्वाधिक प्रभावी ठरत आहे.

सृजनशीलता, वास्तव आणि कल्पना शक्ती यामध्ये खूप सूक्ष्म फरक आहे. त्या खूप सुंदर पद्धतीने एकत्रितपणे आशय निर्मितीसाठी सक्रिय आहेत. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान निश्चितच मोठा प्रभाव टाकत असल्याचे मत मेहता यांनी व्यक्त केले.

०००

वंदना थोरात/विसंअ/