महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदीत पारदर्शकतेसाठी केंद्रिकरणावर भर – सचिव निपूण विनायक

मुंबई, दि. 2 : महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाचे कार्य अधिक गतिमान करण्यात यावे जेणेकरून रुग्णांना वेळेवर औषधे व वैद्यकीय सामग्री उपलब्ध होऊ शकतील, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव निपूण विनायक यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्राधिकरणामार्फत उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. रुग्णसेवेत गुणवत्ता व औषध पुरवठ्यात गती साधण्यासाठी वैद्यकीय खरेदी प्रक्रियेत सुधारणा यावर चर्चासत्रात भर देण्यात आला.

यावेळी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश आव्हाड, महाव्यवस्थापक स्नेहल किस्वे , मुख्य लेखाधिकारी विक्रमसिंह यादव, महाव्यवस्थापक डॉ. संजीवकुमार जाधव यांच्यासह औषध व वैद्यकीय सामग्री उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सचिव निपूण विनायक यांनी यावेळी सांगितले की, तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर औषधांसाठी एक वर्ष व वैद्यकीय उपकरणांसाठी दोन वर्षांच्या कालावधीचे टेंडर काढण्यात येणार आहेत. यामुळे पुरवठा प्रक्रियेत स्थिरता येईल व रुग्णसेवा अधिक गतिमान होईल. त्यांनी वैद्यकीय खरेदी प्रक्रियेत समन्वय व पारदर्शकता असणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत उपस्थित प्रतिनिधींकडून मते जाणून घेतली

प्रत्येक जिल्ह्यात औषध साठवणूक करण्यासाठी वेअरहाऊसची उभारणी करण्यात येणार असून, प्राधिकरणाचे mmgpa.maharashtra.gov.in या संकेतस्थळामुळे उत्पादक कंपन्यांसाठी व्यवहार सुलभ होतील.

औषध पुरवठ्यामध्ये एका कंपनीची मक्तेदारी होऊ नये यासाठी उपाययोजना राबविण्यात येणार असून, विविध जिल्ह्यांमध्ये औषधाचे दर व गुणवत्तेचे प्रमाण राखण्यासाठी स्टँडर्ड इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचा शासनाचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

औषध पुरवठादारांची मते जाणून घेण्यासाठी अशा प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल औषध उत्पादक कंपनी प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. महेश आव्हाड यांनी आभार मानले

000

श्रद्धा मेश्राम/विसंअ/