सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनच्या अध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

मुंबई, दि. २ : सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष प्रिन्स फैसल बिन बंदर बिन सुलतान अल सऊद यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेव्हज् परिषदेदरम्यान सदिच्छा भेट घेतली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, क्रिएटिव्ह उद्योगांतर्गत येणाऱ्या गेमिंग क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. गेमिंगबाबतची बाजारपेठ विस्तारत असून या क्षेत्रात मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे. राज्यातील गेमिंग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सौदीबरोबर काम करण्यास आपण उत्सुक आहोत.  गेमिंग आणि ई-स्पोर्ट संदर्भातील मार्गदर्शक तत्वे तयार करून या क्षेत्रात भागीदारी करण्याबाबत कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनचे चेअरमन प्रिन्स फैसल बिन बदर बिन सुलतान अल सऊद यांनी सौदीमध्ये ई-स्पोर्ट्सच्या विकासासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची यावेळी माहिती दिली. सौदीच्या विकासात ई-स्पोर्ट आणि सॅव्ही गेम यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आशियाई देशांमध्ये गेमिंगचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न असून भविष्यात महाराष्ट्रासोबत काम करण्यास सौदी उत्सुक असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

—०००—

संतोष तोडकर/विसंअ/