ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व व्यापक करण्याची गरज ‘इंडियाज रिच टू ऑस्कर्स’ या विषयावरील चर्चासत्रात तज्ज्ञांचे मत

मुंबई दि. 2 :- भारतात सध्याच्या घडीला ३५ हून अधिक भाषांमध्ये चित्रपट निर्मिती होत असून ऑस्करमध्ये एकाच प्रवेशिकेने संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करणे कठीण आहे. ऑस्करमध्ये चित्रपट पाठविण्याच्या नियमांमुळे केवळ एकाच चित्रपटाची ऑस्करसाठी निवड होत असल्याने प्रादेशिक चित्रपट या संधीपासून वंचित राहतात. यासाठी ऑस्करमध्ये भारताचं प्रतिनिधित्व अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचे मत या चर्चासत्रात मान्यवर तज्ज्ञांनी व्यक्त केले.

मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वेव्हज-२०२५ समिटमध्ये आजच्या दुसऱ्या दिवशी इंडियाज रिच टू ऑस्कर्स या विषयावरील आयोजित चर्चा सत्रात चालवे गौडा, ए. श्रीकर प्रसाद, उज्वल निरगुडकर या मान्यवरांनी सहभाग घेतला.

या चर्चासत्रात चालवे गौडा म्हणाले, भारतात ३५ हून अधिक भाषांमध्ये चित्रपट तयार होतात. त्यामुळे फक्त एकाच प्रवेशिकेने भारताचं प्रतिनिधित्व करणे अवघड आहे. शिवाय, ऑस्करसाठी प्रचार मोहिमांचा खर्चही मोठा अडथळा ठरतो. प्राथमिक मोहिमेसाठी ३० ते ४० लाख रुपये, तर  आरआरआर चित्रपटाच्या  मोठ्या मोहिमेसाठी ५ ते ८ कोटी रुपये लागतात.  तसेच चित्रपट निर्मात्यांना पात्रता निकषांची माहिती नसल्यामुळेही अनेक दर्जेदार चित्रपट स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाहीत. कांतारासारख्या चित्रपटाच्या बाबतीत ही बाब स्पष्ट झाली होती. त्यामुळे राज्य शासनाने अशा चित्रपटाच्या स्पर्धांसाठी कार्यशाळा आयोजित करून माहिती प्रसारित करणे गरजेचे आहे.

या चर्चासत्रात ए. श्रीकर प्रसाद यांनी ऑस्कर नामांकन प्रक्रियेबाबत महत्त्वाचे मुद्दे मांडले. ते म्हणाले, लहान निर्मात्यांसाठी केवळ सरकारमार्फत अधिकृत प्रवेशिकाच एकमेव पर्याय आहे. त्यांना स्वतंत्रपणे पात्रतेचे निकष पूर्ण करणे आणि प्रचार व प्रचार खर्च उचलणे अशक्य असते. आज अनेक दर्जेदार आशय असलेले चित्रपट केवळ निधीअभावी मागे पडतात. त्यामुळे सरकारने किंवा इतर संस्थांनी प्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास निर्मात्यांना प्रसिद्धी तज्ज्ञांशी थेट संपर्क साधता येईल. पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या चित्रपटांना सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे.

जागतिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आशयाचे स्वरूपही महत्त्वाचे असल्याचे नमूद करून श्री. प्रसाद म्हणाले सामाजिक भावना, मानवी मूल्ये आणि सार्वत्रिक भावनांवर आधारित कथा अधिक प्रभावी ठरतात. गेल्या काही वर्षांत चित्रपटांच्या प्रेक्षकवर्गात आणि व्याप्तीत मोठा बदल झाला असल्याचेही ते म्हणाले.

ऑस्कर परीक्षक आणि चित्रपट तज्ज्ञ उज्वल निरगुडकर यांनी सांगितले की, भारतातील निर्माते आणि संस्थांनी ऑस्करमध्ये केवळ “बेस्ट इंटरनॅशनल फिल्म” श्रेणीतच नव्हे, तर लाईव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म, ऍनिमेशन फिल्म, आणि स्टुडंट फिल्म या चार महत्त्वाच्या श्रेणींमध्येही चित्रपट पाठवण्यावर भर द्यावा. विशेषतः स्टुडंट फिल्म श्रेणीसाठी ऑस्कर अकॅडमीदरम्यान दरवर्षी स्वतंत्र स्पर्धा आयोजित केली जाते, ज्यात विजेते चित्रपट मुख्य ऑस्कर स्पर्धेसाठी पात्र ठरतात.

श्री. निरगुडकर म्हणाले, ऑस्कर अकॅडमीद्वारे आयोजित “Nicholl Script writing Competition” आणि “Gold Mentorship Program” यासारख्या संधी भारतीय नवोदित लेखक आणि विद्यार्थ्यांसाठी मौल्यवान ठरतील. चित्रपटातील उपशीर्षक अमेरिकन इंग्रजीत असणे आवश्यक आहे. ऑस्करचे ९० टक्के परीक्षक लॉस एंजेलिसमधील असून त्यांची भाषिक समज वेगळी असते. ते म्हणाले गाण्यांचे उपशीर्षक सरळ भाषांतर न करता त्यामागचा अर्थ थोडक्यात मांडावा. ऑस्करसाठी चित्रपटाची भाषा नव्हे तर आशय, दर्जा, आणि सादरीकरण महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.

0000

एकनाथ पोवार/विसंअ/