मुंबई, दि. २ : ५०० दशलक्षाहून अधिक भारतीय ऑनलाइन आशय वापरत आहेत आणि प्रादेशिक भाषांकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. सर्जनशीलता आणि उत्पादन सशक्त करणे, व्यवसाय मॉडेल्समध्ये नावीन्य आणणे, एआय-कुशल कार्यबलाचे नेतृत्व करणे आणि उद्योजकता वाढवणे यामध्ये भारत आघाडीवर आहे. इंटरनेटपासून मोबाइल आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंतच्या डिजिटल प्रवासात भारताची भूमिका महत्त्वाची असल्याचे अॅडोबचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण यांनी सांगितले.
बीकेसी येथे सुरू असलेल्या वेव्हज २०२५ मध्ये शिखर परिषदेच्या उद्घाटनाच्या दिवशी जागतिक उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या तीन सत्रांमध्ये माध्यम, कथाकथन आणि डिजिटल उत्पादनात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गतिमान प्रवेशाचा वेध घेण्यात आला.
वेव्हज २०२५ : ‘एआय’च्या नेतृत्वाखाली सर्जनशील परिवर्तनासाठी भक्कम पाया
सत्रांमधील चर्चेदरम्यान, एआय हे सक्षमीकरणाचे साधन आहे. ते कोणाची जागा घेणार नाही, असा एकंदर सूर उमटला. डिझाइन, चित्रपट, अॅनिमेशन किंवा कथाकथन असो, जे मूलभूत गोष्टी समजून घेतील, नवीन साधनांचा जबाबदारीने वापर करतील आणि नीतिमत्ता, सर्जनशीलता आणि सर्वसमावेशकतेवर आधारित प्रणाली तयार करतील अशांचे भविष्य निश्चितच उज्ज्वल असेल. जागतिक स्तरावर सर्जनशील आणि तंत्रज्ञानाधारित परिसंस्थेमध्ये भारताच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सबळ पुरावा म्हणजे वेव्हज २०२५ आहे.
“कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात संरचना, माध्यम आणि सर्जनशीलता” या विषयावर अॅडोबचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण विकसित होत असलेल्या सर्जनशील अर्थव्यवस्थेवर विस्तृत दृष्टिकोन मांडताना बोलत होते. ‘एआय’ संचालित चौकट तयार करण्यात भारताचे अद्वितीय स्थान अधोरेखित करताना अनुप्रयोगांपासून डेटा पायाभूत सुविधांपर्यंत श्री.नारायण यांनी चार-स्तरीय धोरणाची रूपरेषा मांडली.
एनव्हीडीओ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विशाल म्हणाले की, “पीसी कार्यालयीन वेळेनंतर निद्रिस्त व्हायचे पण मानवाचे तसे नाही.” एनव्हीआयडीआचा सुरुवातीचा दृष्टिकोन पीसींना सर्जनशील साथीदार म्हणून कल्पना करणे हा आहे. आता कृत्रिम प्रज्ञा समर्थित जगात याचा प्रतिध्वनी कसा उमटतो, याबाबत त्यांनी त्यांचे विचार स्पष्ट केले.
एनव्हीआयडीआचे उपाध्यक्ष रिचर्ड केरिस यांनी, जनरेटिव्ह एआय सह, आपण संकल्पनेपासून निर्मितीकडे खूप वेगाने प्रगती करू शकतो. असे सांगताना त्यांनी मूलभूत गोष्टींशी संपर्क गमावण्याविरोधात सजग केले. आपल्या सर्वांच्या फोनवर कॅमेरा असल्याने आपण सर्वजण उत्तम छायाचित्रकार बनत नाही. एआय तुमच्या हातात विविध साधने देते. परंतु कला, मूलभूत गोष्टी जाणून घेणे आजही तितकेच आवश्यक आहे. सर्जनशील लोक त्यांचे काम अक्षरशः जगतात. कृत्रिम बुद्धिमत्ता त्याची जागा घेत नाही तर ते लोकांना अधिक सक्षम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
तिसऱ्या सत्रात, एनव्हीडीआचे सोल्युशन्स आर्किटेक्ट अनिश मुखर्जी यांनी “जनरेटिव्ह एआय सह गोष्टी सत्यात आणणे” हे सत्र हार्डवेअरच्या पलिकडे जाऊन परिवर्तनात्मक साधनांकडे वळण्याच्या एनव्हीडीआच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकते असे त्यांनी सांगितले. मुखर्जी यांनी एआय-द्वारे सक्षम उपायांचे प्रात्यक्षिक सादर केले, ज्यामध्ये स्थिर प्रतिमा डिजिटल मानवांमध्ये रूपांतरित करणे, बहुभाषिक व्हॉइस-ओव्हर आणि ऑडिओवर आधारित कॅरेक्टर अॅनिमेशन यांचा समावेश होता. एनव्हीआयडीआयएच्या फुगाटो मॉडेलचा वापर करून, त्यांनी एआयद्वारे जनरेट केलेले संगीत आणि डबिंगसाठी वास्तववादी लिप-सिंकिंग दाखवले. त्यांनी ओम्निव्हर्स प्लॅटफॉर्मद्वारे व्हिडिओ जनरेशन आणि सिम्युलेशनवर आधारित प्रशिक्षणासाठी मूलभूत मॉडेल्सचा संच ‘कॉसमॉस’ देखील सादर केला.
०००
सागरकुमार कांबळे/ससं/