शंभर दिवसांच्या विशेष मोहिमेत लोकाभिमुख व नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनी शुभेच्छा !

  • महाराजस्व अभियानात नऊ हजार विक्रमी दाखल्यांचे वितरण !

नंदुरबार, दि. ०१ (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेत जिल्ह्यात तालुका स्तरावरील 28 व जिल्हास्तरीय 54 अशा 82  कार्यालये आणि विभागांनी सहभाग नोंदवून विविध लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात महसूल, कृषि आणि ग्रामविकास विभागांच्या एकत्रित प्रयत्नांनी तब्बल 9 हजार 578 विक्रमी दाखल्यांचे वितरण साध्य करण्यात आले, असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदनाच्या मुख्य कार्यक्रमात शुभेच्छा देताना बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा, प्रभारी पोलीस अधिक्षक आशित कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, महेश चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी जितेंद्र कुवर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकात पवार, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक स्नेहा सराफ, जिल्हा शल्य चिकित्सक के.डी. सातपुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, अंकुश पालवे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे, नगरपालिका प्रशासन अधिकारी नितीन कापडणीस, विभागीय वन अधिकारी मकरंद गुजर, आदि अधिकारी-कर्मचारी लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक हे उपस्थित होते.

पालकमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक गावात पोहोचवण्यासाठी ‘आपली अभ्यासिका’ उपक्रम राबवला जात आहे. जिल्ह्यातील 100 जीर्ण इमारतींना नवे स्वरूप देऊन त्या वाचनालयांमध्ये रूपांतरित केले जात आहेत. विविध योजनांचा निधी व ग्रामपंचायतींचा सहभाग यामुळे ही वाचनालये स्व-अभ्यास, डिजिटल साक्षरता आणि करिअरविषयक माहितीचे केंद्र ठरणार आहेत. ‘आपली अभ्यासिका’ हा केवळ वाचनालयाचा उपक्रम नसून ग्रामीण भागाचा उज्वल भविष्य घडविण्याचा प्रयत्न आहे.

जिल्हा नियोजनातून जिल्हा पोलीस दलाला गुन्हे तपास व गस्तीसाठी 13 नवीन वाहने उपलब्ध झाली आहेत. 100 दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत सर्व पोलीस ठाण्यांची स्वच्छता, रंगरंगोटी व वृक्षारोपणासह नूतनीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 713 ठिकाणी जीपीएस (GPS) आधारित स्मार्ट ई-बीट प्रणालीमुळे निरंतर व  अचूक पेट्रोलिंग सुरू आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याचा कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून, नागरिकांसाठी पोलीस यंत्रणेशी सुसंवाद सुलभ झाला आहे. तसेच, इलेक्ट्रॉनिक मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (eHRMS) मुळे प्रशासन अधिक पारदर्शक व कार्यक्षम बनले आहे.

पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात येत्या खरीप हंगामासाठी 3 लाख 5 हजार 955 हेक्टर क्षेत्रावर पेरणी नियोजित आहे. शेतकऱ्यांसाठी  27 हजार 192 क्विंटल बियाणे व 1 लाख 1 हजार 653 मेट्रिक टन रासायनिक खताचा पुरवठा केला जाणार आहे. बियाण्यांच्या गुणवत्तेसाठी 7 भरारी पथके सज्ज आहेत.  पीएम किसान योजनेत 1 लाख 10 हजार 928 शेतकरी लाभार्थी आहेत व वनपट्टाधारक शेतकऱ्यांची नोंदणीही सुरू आहे. मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीत जिल्ह्याने 4 था क्रमांक मिळवला आहे. सूक्ष्म सिंचनात 3 हजार 270 शेतकऱ्यांना 35 कोटींचा लाभ मिळवून दिला आहे. ॲग्रीस्टॅक फार्मर आयडीसाठी 1 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. कापूस व सोयाबीन अर्थसहाय्य योजनेत 51 कोटी 9 लाख रुपयांचे वाटप झाले आहे.

आपल्या जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागामार्फत 21 वी पशु व कुक्कुट पक्षी गणना प्रभावीपणे पूर्ण झाली आहे. विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे, नाशिक विभागात आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर आणि राज्यात पाचव्या क्रमांकावर आला आहे. जिल्ह्यात 7 ते 25 मे दरम्यान पशुधनासाठी व्यापक लसीकरण मोहीम राबवली जात असून, 7 लाख 76 हजार 900 लसीमात्रा उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी नंदुरबार व शहादा या दोन समित्यांनी आधुनिकतेचा स्वीकार करून ई-नाम प्रणालीत यशस्वी वाटचाल केली आहे. आज या दोन्ही बाजार समित्यांमध्ये व्यवहार डिजिटल माध्यमातून पार पडत आहेत.

पालकमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, स्मार्ट प्रकल्पांतर्गत 2023-24 मध्ये नंदुरबार बाजार समितीने राज्यात 14 वा आणि नाशिक विभागात 3 रा क्रमांक मिळवून जिल्ह्याचा मान उंचावला आहे. शहादा बाजार समितीने देखील राज्यात 36 वा आणि विभागात 13 वा क्रमांक पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीचे मोलाचे योगदान आहे. सन 2025-26 साठी एकूण 656 कोटी 54 लाख 15 हजार रुपयांचा अंतिम आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी 213 कोटी, आदिवासी उपयोजनेसाठी 429 कोटी 54 लाख 25 हजार आणि अनुसूचित जाती योजनेसाठी 14 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेत जिल्ह्यात 20 शासकीय आश्रमशाळांना स्मार्ट टीव्ही, 42 आश्रमशाळा व 16 वसतीगृहांना हायप्रेशर पंप, 8 आश्रमशाळांसाठी व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी खुर्च्या, तसेच 42 आश्रमशाळांसाठी 240 संगणक संच पुरवठा करण्यात आला असून, या उपक्रमांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम करण्यात आल्या आहेत. स्वामित्व योजनेंतर्गत जिल्ह्यातील 29 गावांतील लाभार्थ्यांना त्यांचे प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यात आले.

मुख्यमंत्री ‘तीर्थ दर्शन’ योजनेंतर्गत आपल्या जिल्ह्यातील 800 लाभार्थ्यांसाठी अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिर येथे तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले.  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत लाभ घेतलेल्या 3 हजार 914 प्रशिक्षार्थींना 5 महिने वाढीव प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु झालेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे लोकार्पण करण्यात येणार असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय उपचारासाठी तातडीने मदतीचा हात देणारा हा उपक्रम म्हणजे एक प्रकारची संजविनी आहे. नंदुरबार सारख्या दुर्गम-अतिदुर्गम जिल्ह्यात या सहायता कक्षाची नितांत गरज होती असे ते म्हणाले.

आजपासून ‘जल बंधु’ उपक्रमाची सुरुवात होत असून, जिल्ह्यात 100 गावांमध्ये भूजल पुनर्भरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यात प्राधान्याने 30 जून 2025 पर्यंत 20 गांवे पूर्ण केली जातील. जल जीवन मिशन, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, मनरेगा, वन विभाग व समुदाय सहभाग यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात आहे. हा उपक्रम भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत जलस्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न असून, जलसंधारण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे आजपासून ‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ हे अभियान सुरू झाले असून ते 15 सप्टेंबर 2025 पर्यंत चालेल. या अभियानात सर्व लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री ॲड. कोकाटे यांनी यावेळी केले.

यांचा झाला सन्मान…

पोलीस हवालदार बापू वाघ, 15 वर्षाच्या सेवेचा अभिलेख उत्तम राखल्याबद्दल पोलीस महासंचालकांकडून सन 2024 साठी सन्मानचिन्ह.

बाळु धनगर, तलाठी उपविभाग नंदुरबार यांना आदर्श तलाठी पुरस्कार, प्रशस्तीपत्र व रुपये 5 हजार.

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2022-23

गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार-जितेंद्र पगारे.

गुणवंत खेळाडू (महिला) रिंकी पावरा.

गुणवंत खेळाडू (दिव्यांग खेळाडू) राजू वळवी.

सन 2023-24

गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार-बाबुराव जाधव.

गुणवंत खेळाडू (महिला) कु. अर्पिता काटे.

गुणवंत खेळाडू (पुरुष) भगतसिंग वळवी.

गुणवंत खेळाडू (दिव्यांग खेळाडू) रामसिंग वसावे.

जिल्हा युवा पुरस्कार सन 2022-23

जिल्हा युवा पुरस्कार (युवक) मनिष सनेर

जिल्हा युवा पुरस्कार (युवती) भारती पवार

जिल्हा युवा पुरस्कार (संस्था) सार्वजनिक शिक्षण समिती, नंदुरबार

सन 2023-24

जिल्हा युवा पुरस्कार (युवक) राजेश्वर चौधरी

जिल्हा युवा पुरस्कार (संस्था) सुवार्ता अलायन्स मिनिस्ट्रीज ट्रस्ट, नंदुरबार

यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे, कॅन्सर व्हॅनचे उद्घाटन, आदर्श ग्राम अभियान शुभारंभ, जलबंधु अभियान शुभारंभ व जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

०००