करंजा बंदर देशातील सर्वात मोठे फिशिंग हार्बर म्हणून विकसित करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
106

रायगड जिमाका दि. १- रायगड जिल्ह्यातील करंजा येथे एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचे मच्छीमार बंदर उभारणीचे कामाला गती देण्यात येणार असून त्यासाठी 153 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय  याठिकाणी अत्याधुनिक अशी जेटी तयार करण्यात येणार असून, हे बंदर देशातील सर्वात मोठे फिशिंग हार्बर म्हणून विकसित  करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

उरण नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारत, सावित्रीबाई फुले फुल मार्केट आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन आणि समाज विकास केंद्र, उरण टाऊन हॉल यांचे लोकार्पण आणि उपजिल्हा रुग्णालय भूमिपूजन,उरण चारफाटा येथील मच्छिमार्केटचे  उद्घाटन यासह विविध विकास कामांचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज  उरण येथे झाला. यावेळी  आयोजित कार्यक्रमात ते  बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे  पालकमंत्री उदय सामंत, लोकनेते रायगडचे माजी खासदार रामशेठ ठाकूर मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविंद्र पाटील, आमदार महेश बालदी, जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस म्हणाले की,  न्हावा – शिवडी अटल सेतूमुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली आहे. भविष्यात उद्योगाचे खरे मॅग्नेट रायगड जिल्हा होणार आहे. यामुळे जिल्ह्यात मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. नवी मुंबई विमानतळामुळे जीडीपी मध्ये 1 टक्के  वाढ होणार आहे. डेटाचे हब म्हणून रायगड आणि नवी मुंबईची ओळख निर्माण झाली आहे. या दोन भागांमधून मोठ्या प्रमाणात डेटाची निर्मिती होत असून देशपातळीवर डेटा सेंटर्सची 60 टक्के क्षमता ही रायगड आणि नवी मुंबईत आहे. त्यामुळे या पुढील काळात महाराष्ट्राचे  ग्रोथ इंजिन म्हणून रायगड जिल्हा होत असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे.

मच्छीमारांचे हित जोपासत वाढवण बंदराची उभारणी करण्यात येत आहे. या बंदरामुळे निर्यात क्षमता वाढणार आहे. ग्लोबल सप्लाय चेनचा भाग आपण आता झालो आहोत, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. आमदार महेश बालदी हे अतिशय अभ्यासू लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी अतिशय कल्पकतेने मतदारसंघात दर्जेदार व उत्कृष्ट विकासकामे केली आहेत. त्यांच्या प्रत्येक विकासकामासाठी पुरेसा निधी आणि आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. उरणच्या विकासासाठी सर्वोतॊपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी यावेळी दिली.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले मच्छिमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आ. महेश बालदी सातत्याने आग्रही आहेत. उरणमध्ये सर्वसमावेशक विकास कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. उरणच्या सर्वांगिण विकासाला चालना देण्याचे काम आ. बालदी यांनी केले आहे. उरणच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक नियोजनाच्या माध्यमातून निधी देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खा. श्रीरंग बारणे यांचे मनोगत  झाले.

आ. महेश बालदी यांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीचा पुनःरूच्चर आपल्या प्रास्तविकात केला.

उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी केली. 

कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here