अचलपूर येथील फिनले मिल पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस             

0
21
Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

मुंबई, दि.३१ : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिल पुन्हा सुरू करण्यासाठी महाराष्ट्राचे वेगळे मॉडेल तयार करून तातडीने प्रस्ताव तयार करावा, राज्य सरकार यासाठी पुढाकार घेईल,असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अचलपूर येथील फिनले मिल संदर्भात आढावा बैठक झाली. बैठकीला वस्त्रोद्योग विभाग मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रवी राणा, आमदार बच्चू कडू (ऑनलाइन) केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव रोहित कन्सल, सहसचिव प्राजक्ता लवंगारे,  उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी,वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सौरभ विजय, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, फिनले मिल मधील कामगार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, फिनले मिल सुरू करण्यासाठी राज्य सरकार आर्थिक सहकार्य करायला तयार आहे. महाराष्ट्र शासनाच्या भागीदारीचा सहभाग घेऊन वेगळे मॉडेल  विकसित करण्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव तातडीने तयार करावा. मिलमधील काही कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

अमरावती जिल्ह्यातील फिनले मिल सुरू होणे आवश्यक असून या मिलमुळे मोठ्या प्रमाणत रोजगार निर्मिती आणि वस्त्रोद्योगाला चालना मिळणार आहे. केंद्र सरकारशी समनव्य करून मिल सुरू करण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले

वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फिनले मिल सुरू करण्यात येत असलेल्या अडचणी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मिल कामगार यांची मागणी यासंदर्भात माहिती देऊन मिल सुरू करण्यासाठी वस्त्रोद्योग विभागाचा सहभाग याबाबत माहिती दिली.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here