आदिवासींनी उच्च शिक्षणासाठी योजनांचा लाभ घ्यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
12

पालघर, दि. ९ : जल, जंगल, जमिनीचे रक्षण करत पर्यावरण जपणाऱ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या सहाय्याने सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी सुरू केलेल्या शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना नमन करून जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधवाना शुभेच्छा दिल्या.

आज  पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील राजीव गांधी मैदान येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभागामार्फत राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, श्रीमती कुमुद गावित, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खा. राजेंद्र गावित, आ.शांताराम मोरे, आ.श्रीनिवास वनगा, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप कुमार व्यास हे व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, शासनाने २५० आदिवासी आश्रम शाळांचा कायापालट केला आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परिक्षेचे मार्गदर्शन करण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे.  100 विद्यार्थ्यांना पीचडीसाठी छात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या गावात आदिवासींची लोकसंख्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे. तिथे १७ संवर्गातील भरती ही  स्थानिकांमधूनच करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधा आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी रस्त्यांची उभारणी करण्यात येत आहे.

समाजातील प्रत्येक घटकाला मान, सन्मान आणि विकासाची संधी देण्याचे काम प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या प्रेरणेने होत आहे. आज ऑगस्ट क्रांती दिन आहे. तसेच  ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमांचा शुभारंभही  झाला आहे. भारताच्या स्वतंत्र चळवळीत आदिवासी बांधवांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून त्यांनी शहीद आदिवासींना नमन केले.

देशाचा गौरव जपण्यात आदिवासींचे काम अविस्मरणीय – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आदिवासींची प्राकृतिक परंपरा जपणारी जीवनशैली आहे. देशाचा गौरव जपण्यात आदिवासींचे काम अविस्मरणीय आहे,  असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. त्यांनी आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मूल निवासींसाठीचा हा दिवस असल्याचे सांगितले. भगवान बिरसा मुंडा यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचाही गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.

देशाच्या अर्थसंकल्पात आदिवासींसाठी पाचपट आर्थिक तरतूद वाढविली आहे. आदिवासी विभाग आणि ग्रामविकास विभागाच्या मदतीने प्रत्येक पाडा हा रस्त्याने जोडणार आहे. पालघर आणि गडचिरोली या आदिवासी बहुल भागात प्राधान्याने रस्त्याचे जाळे विकसीत केले जाणार आहे.  शबरी योजनेची तरतूद तीन  पटीने वाढविली आहे. प्रत्येक आदिवासी बांधवास पक्के घर मिळण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.  सुमारे दोन लाख आदिवासींना वनहक्काचे पट्टे वाटप करण्यात आले आहेत. शासकीय रूग्णालय, उत्तम शाळा, पायाभूत सुविधा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून होत असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

आदिवासींच्या विकासासाठी निधी तातडीने देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक असलेला निधी तातडीने वितरीत केला जाईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, आदिवासी बांधव हे खऱ्या अर्थाने निसर्गाचे तसेच संस्कृतीचे संवर्धन करित आहेत. बहुसंख्य आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आठ तालुका असलेल्या पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. हा जिल्हा पर्यटन स्थळ म्हणून अनेकांच्या पसंतीस उतरत असल्याचे त्यांनी सांगितले. पालघरमधील पर्यटन, खाद्यपदार्थ आणि कलेच्या माध्यमातून आदिवासींच्या विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

पालकमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, आदिवासी पाडे हे मुख्य रस्त्यांना जोडणे आवश्यक आहे. या कामाला प्राधान्य देणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम तथा पालघर जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. जिल्हात ५६१ विकास कामं सुरू असून ८० अमृत सरोवर तयार होत असल्याचेही मंत्री श्री चव्हाण यांनी सांगितले.

आदिवासींच्या पाड्यांना जोडणारे रस्ते,त्याच्यासाठी घरे, शिक्षणाच्या सुविधा, धान खरेदी, दाखले वितरण या सर्व योजना पारदर्शकपणे राबवून आदिवासींना जास्तीत जास्त लाभ देणार असल्याची ग्वाही आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.

आदिवासी समाजाचे सांस्कृतिक वेगळेपणा, मानवतेबद्दल असीम श्रध्दा, निसर्गावरील अतुलनीय प्रेम आणि अत्युच्च प्रामाणिकपणा व पारंपरिक निखळ गुणांचा गौरव म्हणून दरवर्षी जागतिक स्तरावर ०९ ऑगस्ट हा “जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस महाराष्ट्रातील समग्र आदिवासी समाजासाठी अस्मितेचा व आत्मसन्मानाचा दिवस आहे.

या कार्यक्रमामध्ये विविध शासकीय योजनांचा मान्यवरांच्या हस्ते लाभ वाटप कार्यक्रम व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या आदिवासी बांधवांचा गुण गौरव करण्यात आला. यावेळी चाळीस प्रकारचे पारंपरिक नृत्य प्रकार सादर करण्यात आले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी विकास आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी जव्हार श्रीमती नेहा भोसले यांनी केले.

माजी आमदार रवींद्र फाटक, आदिवासी विकास आयुक्त श्रीमती नयना गुंडे, विवेक पंडीत, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके,  अपर आयुक्त आदिवासी विकास बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, डहाणू प्रकल्प अधिकारी संजीता महापात्रा, जव्हार प्रकल्प अधिकारी नेहा भोसले, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब फटांगरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थ‍ित होते.

०००

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here