‘राज्य महोत्सव’ गणेशोत्सवाकरिता प्रत्येक शासकीय विभागाने सहभागीता वाढवावी – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

Oplus_0

मुंबई, दि. २२ : गणेशोत्सव हा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ घोषित केले आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती गणेशोत्सवात सहभागी असते. आता ‘गणेशोत्सव’ प्रथमच राज्य शासन साजरा करत असल्याने हा उत्सव आता अधिक व्यापक प्रमाणात साजरा करून त्यात लोकसहभाग वाढवावा. यासाठी प्रत्येक विभागांनी विविध उपक्रमातून आपली सहभागीता वाढवून आपापल्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करावी, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी उपस्थित सर्व राज्य आणि केंद्र सरकारी अधिकाऱ्यांना दिल्या.

Oplus_0

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांच्या उपस्थितीत राज्य तसेच केंद्र शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एमएसआरडीसी महामंडळ, वांद्रे येथे बैठक झाली. या बैठकीस मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी, माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस आयुक्त, मुंबई महानगर विकास प्राधिकरण, म्हाडा, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई विद्यापीठ, सीमा शुल्क, बेस्ट, एमआयडीसी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, एचपीसीएल, बीपीसीएल, मध्य व पश्चिम रेल्वे, भारतीय जीवन विमा प्राधिकरण, राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टीलायझर लि., भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबई जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, अदानी एअरपोर्ट, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य विकास पायाभूत सुविधा महामंडळ, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, महाजनको, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, अदानी पॉवर, टाटा ट्रस्ट, टाटा पॉवर तसेच केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, गणेशोत्सव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता २२ देशांमध्ये साजरा होतो. सार्वजनिक तसेच घरगुती पद्धतीने आणि आता राज्य शासनामार्फतही साजरा होणारा हा गणेशोत्सव सर्व धर्म, जात, भाषांना जोडणारा उत्सव असावा. या गणेशोत्सव काळात तालुका ते राज्य स्तरावरील विविध सांस्कृतिक स्पर्धांसाठी १० कोटी रुपयांची बक्षिसे ठेवली जाणार असून समाजमाध्यमांवरून विशेष मोहीम राबवली जावी. गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक विभागाने नाट्य, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील वर्ल्ड युनोस्कोचा दर्जा मिळालेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले, ऑपरेशन सिंदूर, आत्मनिर्भर भारत, स्वदेशी संकल्पना असे विषय घेऊन कार्यक्रम राबविण्यात यावेत. घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो-व्हिडिओ जगभरातून अपलोड करता यावेत, यासाठी विशेष प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यात प्रमुख मंडळांचे थेट प्रक्षेपण सुद्धा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर चित्रपट महोत्सव, शैक्षणिक कार्यक्रम आदी विषयांवर निबंध, चित्रकला, ब्लॉग स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

गणेशोत्सवाच्या १० दिवसाच्या काळात आपापल्या विभागात विशेष उपक्रम, स्पर्धा, रोषणाई आदींसह विशेष उपक्रम अंतर्गत “ऑपरेशन सिंदूर”द्वारे माजी सैनिकांचा जिल्हानिहाय सत्कार करण्यात यावा. तसेच आत्मनिर्भर भारत व स्वदेशी संकल्पना यांचा गौरव करण्यात यावा, असेही निर्देश मंत्री ॲड.शेलार यांनी या बैठकीत दिले.

गणेशोत्सवाला “राज्य महोत्सव” दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीत भर पडली आहे. लोकसहभाग, डिजिटल प्रसार, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता आणि पर्यावरणपूरक उपक्रम यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता जगाला एकत्र आणणारा सांस्कृतिक सोहळा ठरणार असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

000

संजय ओरके/विसंअ/