यवतमाळ, दि.२१ (जिमाका) : मुख्यमंत्री सहायता निधी अनेक रुग्णांसाठी आधार ठरला आहे. जिल्ह्यात योजनेचा कक्ष सुरु झाल्यापासून हा निधी मिळविणे अधिक सोपे आणि कमी त्रासाचे झाले आहे. जिल्ह्यातील अनेक रुग्णांना या कक्षाचा लाभ झाला असून दोन रुग्णांच्या जटील शस्त्रक्रियांसाठी कक्षाच्या निधीने मोठा दिलासा दिला आहे.
सर्वसामान्य गरीब कुटुंबातील रुग्ण दुर्धर आजारांवर उपचार किंवा शस्त्रक्रिया करू शकत नाही. असे आजार झाल्यास त्यांना खरा प्रश्न पडतो, यासाठी येणारा खर्च करायचा कसा. अशा रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष मोठा आधार देणारा ठरला आहे. अनेक रुग्णांना या कक्षाने वैद्यकीय मदतीचा हात दिला. गेल्या महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयातच कक्ष सुरु झाल्याने रुग्णांना अधिक फायद्याचे ठरत आहे.
यवतमाळ येथील जितेंद्र मनोहर श्रीवास हे ५० वर्षाचे नागरिक आहेत. त्यांच्या मेंदुत संसर्ग झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून ते नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती होते. त्यांना उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाची चिंता होती. विविध ठिकाणी प्रयत्न करूनही त्यांना उपचारासाठी खर्चाची आवश्यक रक्कम जुळविता येत नव्हती. पानठेल्याचा व्यवसाय असल्याने त्यांचे उत्पन्नही जेमतेम होते. कोणत्याही योजनेतून आजारासाठी रक्कम मिळत नसल्याने त्यांना मुख्यमंत्री सहायता कक्षाबाबत समजले. त्यांनी लगेच अर्ज केला आणि त्यांना उपचारासाठी 50 हजार रुपयांची रक्कम तातडीने मंजूर करण्यात आली. या मदतीने ते आपल्या मेंदूतील संसर्गावर उपचार करु शकले.
झरी जामणी तालुक्यातील आंबेझरी या अतिशय दुर्गम गावातील विनोद मधुकर शिंदे यांना क्रॅानिक मायलॅाइड ल्युकेमिया हा आजार होता. अनेक दिवसांपासून ते या आजाराशी झुंजत होते. वर्षाला यासाठी त्यांना बराच खर्च येत होता. मुख्यमंत्री सहायता कक्षास मदतीसाठी अर्ज केल्यानंतर त्यांना 50 हजार रुपयांचे सहाय्य उपचारासाठी मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या मदतीने आजारावर उपचार करता आले. हा कक्ष अतिशय चांगला असून रुग्णांना आधार देणारा असल्याचे या दोनही रुग्णांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले.
वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रियेच्या मदतीसाठी रुग्ण जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षास संपर्क साधू शकतात किंवा https://cmrf.maharashtra.gov.