जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी सदैव कटिबद्ध – मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि. २१ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा): नाशिक जिल्ह्यात नवीन मोठ्या उद्योगांसह मोठे प्रकल्प येण्यासाठी  पोषक वातावरण असून औद्योगिक विकासासाठी सदैव सकारात्मक व कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक मधील निमा व आयमाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा बैठकीत मंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ.अर्जुन गुंडे, महानगरपालिकेच्या अतिरक्त आयुक्त स्मिता झगडे, प्रदीप चौधरी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील,एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता जयवंत पवार निमाचे अध्यक्ष आशिष नहार, आयमाचे अध्यक्ष ललित बूब, मनीष रावल, योगिता आहेर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये मेगा प्रकल्प व मोठे उद्योग येण्याच्या दृष्टीने या प्रकल्पांसाठी आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. नाशिकमध्ये कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन केंद्र तपोवनातील साधुग्रामच्या जागेत विकसित करण्यासाठी  आवश्यक परवानगी  व अनुषंगिक बाबींसाठी महानगरपालिकेने आवश्यक ती कार्यवाही करावी. अंबड या ठिकाणी  चाचणी प्रयोगशाळा  व अग्शीशमन केंद्र कार्यान्वित करण्यात यावेत.  औद्योगिक वसाहतींमध्ये पुढील ५० वर्षांचा विचार करून मलनिस्सारण वाहिन्या विकसित करण्यात यावी. तसेच भुयारी गटारींचे कामही करण्याच्या सूचना मंत्री श्री. भुजबळ यांनी बैठकीत दिल्या.

आगामी  सिंहस्थ कुंभमेळात  होणाऱ्या रिंग रोडमुळे  औद्योगिक वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. नाशिकच्या औद्योगिक व व्यापार व्यवस्थेच्या प्रगतीसाठी  निफाड येथील ड्रायपोर्ट प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. डिफेन्स इनोव्हेशन हब साठी 50 एकर जागेची मागणी असून जागा उपलब्धेसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. राजूरबहुला येथे राखीव 25 एकर जागेत आय टी पार्क विकसित करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. नाशिकमधील अंबड व सातूपर येथील सीटीपीई केंद्र तत्काळ कार्यान्वित करावे. जिल्ह्यातील वाढत्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने नाशिकसाठी स्वतंत्र 400 केव्ही वीजपुरवठा उपकेंद्र उभारण्याची आवश्यकता असल्याचे  मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
000000