विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्याचे निर्देश
शासनाच्या १५० दिवस कार्यक्रमात वर्धा प्रथम येईल यासाठी प्रयत्न करा
वर्धा, दि.२१ (जिमाका) : वर्धा जिल्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पावन झालेला जिल्हा आहे. त्यामुळे विकासाच्या बाबतीत हा जिल्हा कुठेही मागे राहता कामा नये. सर्व विभागांनी एकत्रितपणे लोकाभिमुख कामे करा. विकासकामांसाठी आवश्यक सहकार्य राज्य शासनाच्यावतीने केले जातील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामे व योजनांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार संजय खोडके, आमदार समीर कुणावार, आमदार राजेश बकाने, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलिस अधीक्षक अनुराग जैन, उपवनसंरक्षक हरवीर सिंग, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुध्द राजुरवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नावीण्यपूर्ण योजनेतून कामे घेतांना प्राधान्यक्रम ठरवा. यातून खरेदीची कोणतीही कामे घेऊ नका. जिल्हा वार्षिक योजनेतून तातडीने निधी पाहिजे असल्यास उपलब्ध करुन देऊ. सेवाग्राम विकास आराखड्याची कामे गुणवत्तापूर्वक करा. जुन्या सेवाग्राम गावासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेला अतिरिक्त कामांचा प्रस्ताव सादर करा. सेवाग्राम विकास आराखड्याच्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करा, यास मान्यता देऊ तसेच सेवाग्राम येथे सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
शासन 150 दिवसांचा सुधारणा कार्यक्रम राबवित आहे, त्यामध्ये वर्धा जिल्ह्याचा प्रथम क्रमांक कसा येईल, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. केंद्र शासनाने राज्याला 20 लाख घरकुले मंजूर केली आहेत. त्यामुळे कोणीही घरापासून वंचित राहू नये. घरासाठी जमीन उपलब्ध नसल्यास शासनाच्या धोरणाप्रमाणे लाभार्थ्यांना गायरान जमीन उलपब्ध करुन देऊन घरकुलाचा लाभ देण्यात यावा. उमेदच्या माध्यमातून महिला बचतगटाचा सोलर पॅनलचा चांगला उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. अजून काही गटांना हा उपक्रम सुरु करण्यासाठी मंजुरी देऊ. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सेलसूरा येथील कृषी विज्ञान केंद्रास अधिक सक्षम करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. वर्धा येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे पद अनेक दिवसांपासून रिक्त असल्याने पद भरण्याची मागणी बैठकीत करण्यात आली होती. बैठकीतूनच त्यांनी कृषी सचिवांना संपर्क साधून तत्काळ अधिकारी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले.
आमदार समीर कुणावार यांनी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानासाठी शासनाने डिझेलची तरतूद करुन द्यावी, अशी मागणी केली होती. तसा प्रस्ताव सादर करण्यास उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. हिंगणघाट येथील नवीन पोलिस स्टेशनचा प्रस्ताव, हिंगणघाट येथील 400 बेडचे हॉस्पीटलचा मुद्दा उपस्थित केला. आमदार राजेश बकाने यांनी ब वर्ग पर्यटन तिर्थक्षेत्र कोटेश्वर देवस्थान, कृषी विज्ञान केंद्रास निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा विषय मांडला.
केंद्र योजनांसाठी प्राधान्याने प्रस्ताव करा
केंद्र सरकारच्या वतीने विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन दिला जाते. त्यामुळे केंद्राच्या निधीचे योगदान असणाऱ्या अशा योजनांचे प्रस्ताव विभागांनी प्राधान्याने सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केल्या.
पायाभूत कामांना आयडी उपक्रमाचे कौतूक
पायाभूत विकास प्रकल्पांना युनिक आयडी देण्याचे काम वर्धा जिल्ह्याने अतिशय उत्तमपणे केले आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी वान्मथी सी यांचे कौतुक केले. युनिक आयडीमुळे शासकीय कामांची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असून विकास कामे करतांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्याने ज्या पद्धतीने आयडी देण्याचे काम केले, त्याच पद्धतीने राज्यभर हा उपक्रम राबवू, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांकडून विकास कामांचे सादरीकरण
यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी सादरीकरणाद्वारे जिल्हा वार्षिक योजना, सेवाग्राम विकास आराखडा, तीर्थक्षेत्र विकास, पायाभूत सुविधा, सिंचन, उद्योग, आकांक्षित तालुका, आरोग्य, क्रिडा, गृह, परिवहन, शिक्षण, महिला व बालविकास, आवास योजना, जलयुक्त शिवार, ऊर्जा आदींची माहिती दिली.