मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सदाशिव बडवणे यांना मिळाली उपचारासाठी 1 लाख रुपयांची मदत !

राज्यातील नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवन लाभावे, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरीब, गरजू रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. यामुळे त्यांच्यासाठी या योजनेच्या माध्यमातून मोठा आधार निर्माण झाला आहे. आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेकदा आरोग्यपूर्ण जीवन जगताना अनेक अडचणी निर्माण होताना दिसत आहेत. अनेकदा एखाद्या कुटुंबावर अचानक गंभीर आजाराचा आघात होतो. रुग्णासह संपूर्ण कुटुंबाचा धीर खचून जातो. अशावेळी मुख्यमंत्री सहायता निधीतून रूग्ण व त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळताना दिसत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचाराकरिता अर्थसहाय्य करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळण्यासाठी रुग्णांना आता मुंबईला जाण्याची गरज राहिली नसून प्रत्येक जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय कक्षाची स्थापना 1 मे 2025 पासून करण्यात आली आहे. रुग्णांना आता त्यांच्या स्वत: जिल्ह्यात उपचारासाठी मदतीसाठी अर्ज करता येणार असून अर्जावर झालेल्या कार्यवाहीची माहितीसुध्दा त्यांच्या जिल्ह्याच्या कक्षात मिळणार आहे.

नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत आहे. या कक्षमार्फत नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत या निधीच्या माध्यमातून 539 रुग्णांना मदत केली आहे. यासाठी 4 कोटी 42 लाख 24 हजार एवढा निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय नांदेड कक्षाच्यावतीने दिली आहे.

नांदेड जिल्ह्याच्या या कक्षाच्या माध्यमातून मदत घेतलेल्या रुग्णांकडून याबाबत त्यांच्या शब्दात त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात येत आहेत. यावेळी आपण नांदेड तालुक्यातील पिंपळगाव कोरका येथील रुग्ण सदाशिव गणेशराव बडवणे वय वर्षे 55 यांच्या कुटूंबियाच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यांचा मुलगा राहुल यांनी सांगितले की, वडिलांना एके दिवशी अचानक ताप आला मग त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता नांदेड येथे श्री गंगा हॉस्पिटल यांनी ताप मेंदुला गेला असल्याचे सांगितले. यासाठी त्यांना बराच खर्च येणार होता. यावेळी त्यांच्याकडे पैशाची व्यवस्था नव्हती. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असून अल्पभुधारक शेतकरी आहेत. अशाच परिस्थितीत अचानक आजारपण यामुळे कुटूंबातील कर्ता माणूस आजारी पडल्यामुळे कुटूंबातील इतर सदस्यांना पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी खूप धावपळ करावी लागली. यातच रुग्ण कोमात गेला. त्यानंतर श्री गंगा हॉस्पिटल नांदेड येथे त्यांच्यावर 17 ते 18 दिवस उपचार करण्यात आले. यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मदतीसाठी अर्ज केला व सर्व कागदपत्रांची पूर्तता केली.  त्यानंतर त्यांचा अर्ज तात्काळ मंजूर होवून त्यांना मदत कक्षाकडून 1 लाख रुपयांची मदत मिळाली. या मदतीमुळे त्यांच्यावर यशस्वी उपचार करुन ते यातून सुखरुप बरे झाले व घरी परतले आहेत.

या मदत निधीमुळे त्यांचा मुलगा राहुल व मुलगी जयश्री, पत्नी पार्वतीबाई बडवणे यांनी महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाच्या माध्यमातून मदत मिळाल्यामुळे त्यांच्या वडीलांचे जीव वाचला याबाबत त्यांनी मनापासून आभार मानले. गरजू व पात्र लाभार्थ्यांना या मदतीमुळे खूप मोठा आधार मिळत असून ही मदत गरजू रुग्णांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरत आहे.

 

अलका पाटील

उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय नांदेड

00000