रानभाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश करावा -पालकमंत्री संजय राठोड

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन

यवतमाळ, दि. १८ (जिमाका): अलिकडे प्रत्येकाचेच जीवनमान, दैनंदिन सवयी व खानपान बदलले आहे. सकस, पोषक आहाराऐवजी घातक अशा गोष्टींचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शरीर निरोगी आणि उत्तम राहण्यासाठी प्रत्येकाने नैसर्गिकरीत्या पिकत असलेल्या रानभाज्यांचा समावेश आपल्या दैनंदिन आहारात करावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन केंद्र येथे कृषी विभाग, आत्मा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, मुख्य वन संरक्षक किशोर मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे आदी उपस्थित होते.

अलिकडे रासायनिक खते, औषधांचे प्रमाण वाढले आहे, यामुळे आपण आहारात घेत असलेल्या भाज्या शरीरास घातक झाल्या आहेत. चांगल्या आरोग्यासाठी चांगले जीवनसत्व असलेल्या गोष्टी शरीरात जाणे आवश्यक आहे. रानभाज्यांवर कोणत्याही प्रकारची रासायनिक खतांची फवारणी होत नाही. नैसर्गिकरीत्या या भाज्या तयार होतात. या भाज्यांमध्ये अधिक जीवनसत्व आढळून आले आहे, त्यामुळे प्रत्येकाने या भाज्यांचा समावेश आहारात केला पाहिजे, असे पालकमंत्री राठोड म्हणाले.

रानभाज्या आपल्याला परंपरेने लाभलेला नैसर्गिक ठेवा आहे. आपल्या लहानपणी प्रत्येकाच्याच घरात या भाज्या खाल्ल्या जायच्या. रानभाज्यांचा हा नैसर्गिक ठेवा टिकला पाहिजे आणि पुढच्या पिढीला उपलब्ध झाला पाहिजे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. या भाज्यांचे महत्व सांगून तिच्या प्रसारासाठी दरवर्षी रानभाजी महोत्सव घेतला जात असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

आमदार मांगुळकर म्हणाले, शेतातल्या भाजीवर रासायनिक औषधांचा वापर केला जातो. त्यामुळे अशा भाज्या आरोग्याच्या दृष्टीने परिणामकारक आहे. रानभाज्या नैसर्गिकरीत्या तयार होत असल्याचे या भाज्यांचा आहारात समावेश होणे आवश्यक आहे. सामाजिक वनीकरण विभागाचे या भाज्यांची रोपे तयार करुन भाज्यांना प्रोत्साहन देता येईल, याचा विचार करावे, असे सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना व मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी देखील रानभाज्यांचे महत्त्व विषद केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी प्रास्ताविक केले. सुरुवातीस पालकमंत्र्यांनी फित कापून महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी महोत्सवात लावण्यात आलेल्या विविध रानभाज्यांच्या स्टॉलस्‌ना भेट देऊन पाहणी केली तसेच रानभाज्यांचे महत्त्व व त्यांच्या गुणकारी तत्वांची माहिती जाणून घेतली. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते रानभाज्यांची माहिती असलेली पुस्तिका व माहिती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते‌‌.

शेतकऱ्यांना सानुग्रह मदतीचे वाटप

विविध नैसर्गिक आपत्तीत अपघात झालेल्या शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाते. जिल्ह्यातील अशा १२७ अपघातग्रस्त शेतकरी, कुटुंबियांना मदत मंजूर झाली आहे. या शेतकऱ्यांना २ कोटी २० लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार असून पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना मदत मंजूरी पत्राचे वितरण करण्यात आले.

०००