शासकीय योजनांच्या लाभासाठी समन्वय यंत्रणा म्हणून पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईन उपयुक्त ठरेल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईनचे उद्‌घाटन

– सेवा, सुशासन, गरीब कल्याणाचे उद्दिष्ट गतिशील करण्याचा हेतू

– हेल्पलाईन संपर्क क्रमांक 8806088064

 सांगली, दि. 15 : सर्वसामान्यांसाठी केंद्र आण राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित आहेत. या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र, गरजू आणि वंचितापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी समन्वय यंत्रणा म्हणून पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईन उपयुक्त ठरेल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.

सांगली जिल्ह्यासाठी नाविन्यपूर्ण सेवा प्रकल्पअंतर्गत पालकमंत्री कार्यालय (जीएमओ) हेल्पलाईनचे उद्‌घाटन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यक्रमास आमदार सदाभाऊ खोत, माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सत्यजीत देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, दीपक शिंदे म्हैसाळकर, संग्राम महाडिक, निशिकांत पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

‘विकसित भारत, विकसित महाराष्ट्र, विकसित सांगली जिल्हा’ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून पालकमंत्री कार्यालय (जीएमओ) हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना जलद व सुलभ पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवणे, त्याबाबत मार्गदर्शन करणे, जिल्हा स्तरावरील तक्रारींचे त्वरित निवारण करणे व विविध शासकीय विभागांत समन्वय साधून सेवा अधिक गतिमान करण्याचा संकल्प स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून करण्यात आला. पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईन संपर्क क्रमांक 8806088064 असून ई मेल helpline@gmosangli.in असा आहे. तसेच https://gmosangli.in/ या संकेतस्थळावरून यामध्ये सहभागी होता येईल. पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्याशी समन्वय ठेवून या हेल्पलाईनचे कामकाज करण्यात येणार आहे.

सेवा, सुशासन व गरीब कल्याणाचे उद्दिष्ट गतिशील करणे हा हेतू ठेवून पालकमंत्री कार्यालय (जीएमओ) हेल्पलाईन सुरू केली असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सर्वसामान्यांसाठी शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित आहेत. मात्र, तळागाळापर्यंत त्यांची माहिती नसल्याने अनेक पात्र नागरिक त्यापासून वंचित राहतात. त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातून असे वंचित पात्र नागरिक शोधणे, त्यांना योजनांची व आवश्यक कागदपत्रांची माहिती सोप्या व सुलभ पद्धतीने देणे व योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, हे सांगताना त्यांनी पुण्यात सुरू केलेल्या महिलांचे आरोग्य जपणारा सुखदा उपक्रम, शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रवेशासाठी स्कूल कनेक्ट योजना, सारथी, स्वाधार योजना, सुकन्या समृद्धी योजना आदिंची सविस्तर माहिती दिली.

नागरिकांचे समस्या निवारण, समन्वय व शासकीय उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, सामाजिक उत्तरदायित्त्व निधी यांची सांगड घालून शासकीय योजना जलद गतीने पोहोचवण्यास ही हेल्पलाईन मदतीची ठरेल, असा विश्वास व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करताना प्रगत सांगलीचे चित्र रेखाटून जनतेच्या विश्वासाला प्रतिसाद देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. यामधून नागरिकांच्या समस्या सोडवण्याबरोबरच नवनवीन संधी निर्माण करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत. महिलांचे आरोग्य जपणे, दुपारच्या वेळेत महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे. अशा माध्यमातून प्रशासकीय योजनांसोबत लोकसहभाग केंद्रबिंदू ठेवून गतिशील नियोजन करण्यात येत आहे. यासाठी स्वयंसेवकांची निवड करण्यात येणार आहे.

प्रारंभी रिमोटची कळ दाबून या उपक्रमाचे आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार सर्वश्री सदाभाऊ खोत, सत्यजीत देशमुख आणि डॉ. सुरेश खाडे, दीपक शिंदे म्हैसाळकर, रमाकांत मालू यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विजय वरूडकर यांनी केले. आभार नरेंद्र यरगट्टीकर यांनी केले. विशाल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000