शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणेच्या विशेष मोहिमेतील कामगिरीबद्दल सातारा जिल्हा माहिती कार्यालयाचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते सन्मान

सातारा दि. १५ – राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांना राज्याचे पर्यटनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोण समारंभ संपन्न झाला.  यावेळी  झालेल्या कार्यक्रमात प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.  याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्यासह  जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी राहूल पवार, वैभव जाधव, रुपाली तारळकर, अनिल नलवडे, सचिन राऊत, अनिता काशिद उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यात 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिम राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरांवरील एकूण 12 हजार 500 शासकीय कार्यालयांमध्ये यशस्वीपणे राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये जिल्हा माहिती अधिकारी या गटातून राज्यस्तरावर जिल्हा माहिती कार्यालय सातारास तृतीय क्रमांकाने निवडण्यात आले आहे.

जिल्हा माहिती कार्यालय हे नेहमीच माध्यमाभिमुख राहिले असून शासनाच्या विविध योजना, उपक्रम, कार्यक्रम निर्णय निर्देश यांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमांमधून व्यापक प्रसिध्दी देण्याचे काम हे कार्यालय अव्याहतपणे करत असते.  शासन आणि प्रसारमाध्यमे यांच्यामधला दुवा म्हणून हे कार्यालय महत्वाची भूमिका बजावते. माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक हेमराज बागूल, किशोर गांगुर्डे, गणेश मुळे तसेच पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा माहिती कार्यालयाने 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेमध्ये अभिलेख निंदणीकरण व वर्गीकरण, जूने संगणक, व इतर निरुपयोगी साहित्यांचे निर्लेखन, कार्यालयाचे सौंदर्यीकरण यावर भर दिला.  कार्यालयामध्ये येणाऱ्या अभ्यागतांसाठी बैठकव्यवस्था, व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासोबतच वाचनासाठी विविध मासिके, पुस्तके उपलब्ध करुन दिली आहेत.  जिल्ह्यात राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडून दिनांक 2 ते 4 मे 2025 या कालावधीत महाबळेश्वर येथे होणाऱ्या महापर्यटन महोत्सवामध्ये सातारा जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे याशी संबंधित छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

000