नागरिकांना विहित वेळेत आणि सुरळीत डिजिटल सेवा द्या – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

रायगड जिमाका दि. १५– आधार कार्ड नोंदणी आणि प्रमाणिकरण प्रक्रियेला गती देण्यासाठी शासनाने आधारसंच उपलब्ध करून दिले आहे. तरी या सर्व संच धारकांनी वेळेत आणि सुरळीत नागरिकांना सुविधा दयाव्यात अशा सूचना  महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांनी दिल्या.

नियोजन भवन येथे महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यासाठी प्राप्त नवीन आधार संचाचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आचल दलाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपवनसंरक्षक राहुल पाटील,  उपजिल्हाधिकारी डॉ रविंद्र शेळके उपस्थित होते.  जिल्ह्यात 71 संचचे वाटप यावेळी करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना कु. तटकरे म्हणाल्या, आधार कार्ड आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांना ही सेवा वेळेत आणि सुरळीत मिळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते. माहिती व तंत्रज्ञान विभागाने उपलब्ध करून दिलेल्या या किटमुळे महानगरी भागांपासून अगदी दुर्गम गावांपर्यंत प्रत्येक नागरिकाला आधार नोंदणी आणि अद्ययावत सेवा सहज मिळणार आहेत. या सर्व आधार संस्थाचालकांनी नियमाचे पालन करून सेवा उपलब्ध करून द्याव्यात असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आधार प्रामाणिकरण सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी डॉ रविंद्र शेळके यांनी केले.

इतिहास बदलणारे पाणी कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

रायगड जिल्हा माहिती कार्यालयाची निर्मिती असलेल्या महाड चवदार तळे सत्याग्रहावर आधारित कॉफी टेबल बुकचे महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील प्रमुख ऐतिहासिक घटना, स्थळे सर्व तरुणांईपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने समाज माध्यमातून प्रसिद्धी करावी तसेच या पुस्तकाची ई आवृत्ती तयार करावी अशा सूचना कु. तटकरे यांनी दिल्या. यावेळी
जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आचल दलाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपवनसंरक्षक राहुल पाटील,  उपजिल्हाधिकारी डॉ रविंद्र शेळके, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
०००